ED नोटीस प्रकरण ! ‘सरकारचं आमच्यावर खूप ‘प्रेम’ आहे’ ! शर्मिला ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज ठाकरेंना कोहिनुर मिल प्रकरणी ईडीने नोटीस पाठवली आहे. येत्या २२ ऑगस्टला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. मात्र या विरोधात आता अनेकांच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. मनसेच्या संदिप देशपांडे यांनी आम्ही ‘हिटलर’शाही विरोधात लढतच राहणार असल्याचे म्हटले आहे.

राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणतात आम्ही कोहिनूर मिल व्यवहारातून कधीच बाहेर पडलो आहे. मात्र आमच्यावर सरकारचं खूप प्रेम आहे. मुळातच हे प्रकरण २००८चं आहे. आम्हाला अशा अनेक नोटीस येत असतात. आम्ही या नोटिशींना उत्तर देण्यास सक्षम आहोत, अशी प्रतिक्रिया शर्मिला ठाकरेंनी दिली आहे.

काय म्हणाल्या नेमकं शर्मिला ठाकरे
ईडी, सीबीआयची आम्हाला सवय आहे. आम्हाला दबावात ठेवण्यासाठी हे तंत्र वापरण्यात आलं आहे. पण माझा नवरा घाबरणार नाही. निवडणुका जवळ आल्याने राज ठाकरेंना चौकशीच्या फेऱ्यात अडकविण्याचा प्रयत्न आहे. तसेच चौकशीसाठी राज ठाकरेंना बोलविलं असल्यामुळे आम्ही चौकशीसाठी नक्की जाणार आणि सगळे पेपर त्यांना देणार. तसेच सत्ताधाऱ्यांना वाटत असेल की आम्हाला ईडीचा अर्थ माहित नाही आणि आम्ही अडाणी आहोत, असा त्यांचा गैरसमज आहे अशा प्रकारचा टोला शर्मिला ठाकरे यांनी यावेळी लगावला आहे.

काय आहे नेमकं कोहिननूर प्रकरण
राज ठाकरे, राजेंद्र शिरोडकर आणि उन्मेष जोशी यांनी मिळून दादर येथील कोहिनूर मिलची जागा खरेदी केली होती. मात्र त्यानंतर आयएलएफएसचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर राज ठाकरे यांनी २००८ साली या प्रकरणी आपले सर्व शेअर्स विकले होते. मात्र, त्यानंतरही राज ठाकरे या कंपनीत सक्रिय असल्याचे सांगत याप्रकरणाची ईडीकडून चौकशी सुरु आहे.

आरोग्यविषयक वृत्त

You might also like