‘माझी मानसिक स्थिती ठीक नाही’, स्कोर्पिओ मालक ‘मनसुख’चं मुंबई अन् ठाणे पोलीस आयुक्तांना पत्र

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कोर्पिओ गाडी सापडल्यानंतर खळबळ उडाली होती. या घटनेचा तपास सुरु असतानाच स्कोर्पिओचा मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाणे येथील मुंब्रा येथील रेतीबंदर येथे आज आढळून आला. गुरुवारी रात्री हिरेन यांचा मुलगा नेहमीप्रमाणे दुकानात जेवणाचा डबा घेऊन आला होता. जेवण केल्यानंतर ते साडे आठच्या सुमारास मुलाला दुकानात थांबवून मी बाहेर जाऊन येतो असे सांगून दुचाकीवरुन गेल्याची माहिती दुकानातील कर्मचाऱ्याने दिली.

मुकेश अंबानी यांच्या दक्षिण मुंबईतील अँटिलीया निवासस्थानासमोर सापडलेल्या स्कॉर्पिओचा मालक मनसुख हिरेन याची पोलीस चौकशी करत होते. मात्र, मानसिक स्थिती ठिक नसल्याबाबत ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर आणि मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांना मनसुख यांनी पत्र दिल्याची माहिती समोर आली आहे.

मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा येथील रेतीबंदर येथे आज आढळून आल्यानंतर विरोधी पक्षनेते देंवेंद्र फडणवीस यानी याबाबत अधिवेशनात मुद्दा उपस्थित केला होता. तसेच पत्रकरांशी बोलताना यामागे काहीतरी गौडबंगाल असल्याचे दिसत असल्याचे फडणवीस यांनी म्हटले होते. पोलिसांच्या प्राथमिक तपासात खाडीत उडी मारुन आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. मनसुख हे ठाण्यातील नौपाडा येथे वास्तव्यास होते. आज सकाळी साडे दहाच्या सुमारास त्यांचा मृतदेह खाडीतून बाहेर काढला. मनसुख हे बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबियांनी नौपाडा पोलीस ठाण्यात दिली होती. मात्र, त्यांच्या संशयास्पद मृत्युमुळे वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

पोलिसांत गाडी चोरीची तक्रार

लॉकडाऊनमुळे बरेच दिवस गाडी बंद होती. 17 फेब्रुवारी रोजी ऑपेरा हाऊस येथे काम असल्याने त्यांनी कार दुरुस्त करुन घेतली. मात्र, ऐरोली ब्रिजजवळ गाडीचे स्टेअरिंग जाम झाल्याने गाडी तेथेच पार्क करुन मनसुख हे पुढे निघून गेले. 18 फेब्रुवारी रोजी गाडी घेण्यासाठी ते गेले असता त्यांना गाडी दिसली नाही. त्यामुळे त्यांनी विक्रोळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.