रॉबर्ट वाड्रा यांचे राजकारणात येण्याचे संकेत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रियांका गांधी यांच्या सक्रिय राजकारणातील प्रवेशानंतर आता प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी देखील राजकारणात प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले आहेत. असे संकेत देणारी त्यांची एक फेसबुक पोस्ट सध्या चर्चेत आहे. ‘मनी लाँडरिंग प्रकरणात मला नाहक गोवन्यात आले आहे. या प्रकरणी सुरु असलेली चौकशी संपवल्यानंतर देशवासीयांच्या सेवेसाठी आणि त्यातही उत्तर प्रदेशातील जनतेसाठी मी महत्वाची भूमिका पार पडणार आहे’. असे वाड्रा यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.

सोनिया गांधी यांचे जावई आणि प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांची सध्या मनी लाँडरिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाकडून चौकशी करण्यात येत आहे. मध्यंतरी त्यांच्या आईंना देखील चौकशी करिता बोलवण्यात आले होते. तेव्हा देखील त्यांनी आपल्याला आईच्या चौकशीबद्दल याबद्दल वाईट वाटत असल्याच्या भावना व्यक्त केल्या होत्या. आता पुन्हा एकदा भावनिक पोस्ट लिहून त्यांनी आपलं मन मोकळं केलं आहे.

माझ्या बदनामीची कारस्थानं रचतायत …

देशातील मूळ समस्या आणि प्रश्नांपासून लक्ष अन्यत्र वळवण्यासाठी गेल्या दशकभरापासून विविध सरकारं माझ्या बदनामीची कारस्थानं रचत आहेत. मात्र, या आरोपांत काहीच तथ्य नसल्याचं आता लोकांनाही कळून चुकलं आहे. लोकांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. म्हणूनच मी या सर्वांचा आभारी आहे, असे वाड्रा यांनी नमूद केले. दिल्ली, राजस्थान येथे ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहिलो. आठ-आठ तास चौकशी झाली. प्रत्येक नियमाचे मी पालन केले. अर्थात मी किंवा अन्य कुणीही कायद्यापेक्षा मोठा नाही, याची पूर्ण जाणीव मला आहे. या सगळ्याच गोष्टींतून मला बरंच काही शिकायला मिळत आहे. मी अधिक कणखर बनत आहे, असेही वाड्रा यांनी पुढे नमूद केले. वाड्रा यांनी इंग्रजी आणि हिंदीतून ही पोस्ट लिहिली असून केरळ आणि नेपाळमधील मदतकार्याचे काही फोटोही शेअर केले आहेत.