PM-Kisan Yojana मध्ये चुकीचे आधार किंवा खाते नोंदवल्याने मिळत नसतील पैसे तर ‘या’ पध्दतीनं करा दुरूस्ती, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   मागील वर्षी सुरू झालेल्या पंतप्रधान किसान योजनेत आता कोट्यवधी शेतकरी सहभागी झाले आहेत. या योजनेतील लाभार्थी शेतकर्‍यांना वार्षिक तीन हप्त्यात एकुण 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे. आतापर्यंत केंद्र सरकारने या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना 6 हप्ते जारी केले आहेत आणि 7 वा हप्ता लवकरच ट्रान्सफर केला जाणार आहे.

मात्र, पंतप्रधान किसान योजनेच्या सहाव्या हप्त्यात सुद्धा हजारो शेतकरी असे होते, जे या योजनेच्या कक्षेत येत असूनही त्यांना लाभापासून वंचित राहावे लागले. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केल्यानंतर सुद्धा हप्ता अडकण्याची अनेक कारणे असू शकतात. अर्ज तर केलेला असतो, परंतु पैसे खात्यात पोहचत नाहीत.

परंतु, सरकार त्या लाभार्थ्यांचा हप्ता रोखते, ज्यांच्या अर्जात चुकीचा आधार नंबर आणि नावाच्या स्पेलिंगमध्ये चूक किंवा अन्य एखादी चूक झालेली असते. अशा स्थितीत सरकार शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे जारी करत नाही. मात्र, असे नाही की, एकदा अर्जात चूक झाली म्हणून पुन्हा ती दुरूस्त करता येत नाही, सरकारने यासाठी चुक सुधारण्याची सुविधा दिलेली आहे.

पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचा आधार नंबर दुरूस्त करू शकता. यासाठी तुम्ही https://www.pmkisan.gov.in/updateaadharnobyfarmer.aspx येथे क्लिक करा. याशिवाय जर तुमच्या नावात चूक असेल किंवा अकाऊंट नंबर दुरूस्त करायचा असेल तर वेबसाइटच्या होम पेजवर तुम्ही Benificary status वर क्लिक करून ते दुरूस्त करू शकता.