नरेंद्र मोदी ‘नीच माणूस’, मी योग्यच बोललो होतो : मणिशंकर अय्यर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले आहे. नरेंद्र मोदी यांना ‘नीच’ बोलणे योग्यच होते, असे मणिशंकर अय्यर यांनी म्हटले आहे. यावरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. २०१७ मध्ये झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ‘नीच प्रकारचा माणूस’ असा आपण केलेला उल्लेख योग्यच होता, असे सांगणारा लेख अय्यर यांनी लिहिला आहे.

लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा बाकी आहे, मात्र यादरम्यान अय्यर यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे वादळ निर्माण झाले आहे. गुजरात विधानसभेच्या वेळी मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधान मोदींचा ‘नीच’ म्हणून उल्लेख केला होता. यानंतर भाजपने काँग्रेसला धारेवर धरत अय्यर यांनी माफी मागावी, अशी मागणी केली होती. त्यावेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सांगितल्याने त्यांनी माफी मागितली देखील होती पण मणिशंकर यांनी माफी मागतानाही जर तर शब्दांचा प्रयोग केल्याने संतापलेल्या राहुल गांधी यांनी मणिशंकर यांची थेट पक्षातूनच हकालपट्टी केली होती. त्यांच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका लेखात त्यांनी त्यावेळेचा हवाला देत म्हटले आहे कि, २०१७ मध्ये मी नरेंद्र मोदी यांना काय म्हटले होते हे आठवते का? मी योग्य भविष्यवाणी केली नव्हती का?” २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत देखील मणिशंकर अय्यर यांनी नरेंद्र मोदी यांना ‘चहावाला’ म्हणून हिनवल्याने काँग्रेसला पराभूत व्हावं लागलं होतं.

दरम्यान, मणिशंकर अय्यर यांच्या या लेखावर पुन्हा एकदा काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप -प्रत्यारोपाचे राजकारण रंगणार हे मात्र नक्की .. !