‘मेरा वोट काम को’, ‘आप’ची नवी घोषणा

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात आम आदमी पार्टीने विकासाच्या मुद्यावरच भर देत पुढील आठ दिवस मोहीम राबवायचे ठरविले आहे. मेरा वोट काम को, सीधे केजरीवाल को… अशी घोषणा दिली असून केजरीवाल सरकारचे रिपोर्ट कार्ड, गॅरंटी कार्ड मतदारांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

अच्छे गये पांच साल… अशी घोषणा देत आम आदमी पार्टीने प्रचाराला सुरुवात केली आणि प्रचाराची सांगताही विकासाच्या मुद्यावर करणार असे स्पष्ट झाले आहे. प्रतिस्पर्धी भाजपने सीएए, शाहीन बाग आंदोलन असे राष्ट्रीय मुद्दे मांडले, पण आम आदमी पार्टी स्थानिक विकास हाच मुद्दा मांडत आहे.

सीएएच्या विरोधात शाहीन बाग येथे आंदोलन चालू आहे. येत्या काही दिवसात आंदोलन कोणते वळण घेते यावर बरेच अवलंबून आहे. भाजपने हीन राजकारण सोडावे आणि आंदोलनकर्त्यांची भेट घ्यावी असे केजरीवाल यांनी म्हटले आहे. भाजपने अद्याप दाद दिलेली नाही. दिल्लीतील शाळांना भेट द्यावी आणि मगच टीका करावी असे केजरीवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना म्हटले आहे.