माझ्यापेक्षा बायको अमृताचा पगार जास्त : फडणवीस

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  – राज्याचे बजेट आणि घरच्या बजेटमध्ये फारसा फरक नसतो. राज्याचे बजेट व्यापक असते तर घरचे मर्यादीत असते. आपण घरचे बजेट तयार करतो तेव्हा सगळ्या गोष्टींचा विचार करतो. बायकोचा पगार आणि आपला पगार, याच्यावर घरचे बजेट तयार करतो, असे सांगतानाच माझ्या पत्नीचा पगार हा माझ्या पगारापेक्षा जास्त आहे. त्यामुळे तो मला जास्त लक्षात राहतो, असे मिश्किलपणे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे बजेट आणि घरचे बजेट यातील फरक उपस्थितांना सांगितला. फडणवीस यांनी लिहिलेले अर्थसंकल्प सोप्या भाषेत या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मुंबईत झाले. यावेळी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी आपआपल्या भाषणात तुफान फटकेबाजी करत एकमेकांना टोले लगावले.

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, सर्वसामान्य लोकांना सोप्या भाषेत अर्थसंकल्प समजावा यासाठी हे पुस्तक लिहिले आहे. अर्थसंकल्प ही एक रचना आहे. त्याची कार्यपद्धती आणि रचना समजली की राज्याचा असो की केंद्राचा, अर्थसंकल्प समजणे सोपे जाते. तो वाचता येतो आणि त्याचे विश्लेषणही करता येते. अर्थसंकल्पात राजकोषीय तूट, वित्तीय तूट असे अनेक शब्द येतात. त्यामुळे तो किचकट वाटतो. पण तसे काही नाही. आपणही आपल्या घरचे बजेट करतो. पती-पत्नीचा पगार ही आवक आणि घरखर्च ही जावक असते. त्यासाठी आपण फिस्कल मॅनेजमेंट करतो. तसेच राज्याचेही मॅनेजमेंट असते. राज्यही उत्पन्न आणि खर्चाचे मॅनेजमेंट करते. यात फार फरक नसतो. फक्त राज्याच्या बजेटमध्ये व्यापकता असते. हे योग्यप्रकारे समजून घेतल्यास बजेटबाबतची भीती दूर होऊ शकते.

नव्या-जुन्या सदस्यांना बजेट समजून घ्यायचा असेल तर त्यांना बजेट समजावून सांगण्याची माझी तयारी आहे. नव्या सदस्यांना पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनही द्यायला मी तयार आहे. जास्तीत जास्त सदस्यांना अर्थसंकल्प समजला पाहिजे. म्हणजे अजित पवार यांना अधिकाधिक त्रास देता येईल, असे म्हणत फडणवीस यांनी अजित पवार यांना चिमटा काढला.

फडणवीस म्हणाले, 2005मध्ये अर्थसंकल्प म्हणजे नेमकं काय? हे पुस्तक लिहिले होते. त्यानंतर बरेच बदल झाले. अर्थसंकल्पाशी संबंधीत काही कायदे सुद्धा बदलले. त्यामुळे नव्या संकल्पनांसह हे पुस्तक लिहिले आहे. हे पुस्तक सर्वसामान्य लोकांना अर्थसंकल्प कळावा म्हणून लिहिले आहे, ते पीएचडी करणार्‍यांसाठी नाही. पुस्तक 40 मिनिटांत वाचून होईल, 45 मिनिटे लागणार नाही, हे ठरवूनच लिहिले आहे.