म्यानमारमध्ये हिंसाचार : राजकीय नेत्यांच्या वाहनांवर सशस्त्र हल्ला, 12 ठार

यंगून (म्यानमार) : वृत्तसंस्था – म्यानमारमध्ये आँग स्यान स्यू की यांच्या नेतृत्वाखाली लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या सरकारविरोधात बंड पुकारून लष्कराने उठाव केल्यापासून म्यानमारमध्ये अराजकता पसरली असून आता हिंसक घटनाही घडू लागल्या आहेत. कोकांग या स्वप्रशासित क्षेत्राच्या माजी सत्ताधिकाऱ्यांच्या समितीतील प्रमुख सदस्याच्या ताफावर डेमोक्रॅटिक अलायन्स आर्मीच्या सदस्यांनी शनिवारी (दि.6) सशस्त्र हल्ला केला. हल्ल्यात 12 जणांचा मृत्यू झाला असून यात 9 नागरिक आणि तीन पोलिसांचा समावेश आहे. देशाची राजधानी लशिओ ते लउकाइ (कोकांगची राजधानी) या दरम्यानच्या रस्त्यावर ही घटना घडली. याबाबतचे वृत्त झिन्हुआ या वृत्तसंस्थेने दिले आहे.

म्यानमारमधील कोकांग या स्वप्रशासित क्षेत्रातील पूर्वीच्या मध्यवर्ती कार्यकारी समितीचे सदस्य यू खिन माउंग लविन यांच्या नेतृत्वाखाली हा ताफा जात असताना म्यानमार नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स आर्मीच्या 20 सदस्यांनी हा हल्ला केला. यात 12 जणांचा मृत्यू झाला आहे. येथील लष्कराने सशस्त्र गटाविरोधातील कारवाईची मुदत येत्या 28 पर्यंत वाढविली असल्याचे शिन्हुआने सांगितले.

म्यानमारमध्ये लष्कराने सत्ता हस्तगत केल्यानंतर आणि देशातील लोकशाही पुरस्कृत नेत्यांना अटक केल्याच्या घटनेनंतर येथे नागरिकांवर अनेक बंधने लादली आहेत. देशभरातील इंटरनेट सेवा शनिवारपासून बंद केली असून इंटरनेट खंडित करण्याची ही आठवडाभरातील दुसरी आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून खोट्या बातम्या पसरविल्या जात असल्याचा दावा करीत लष्कराने आज ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्रॅमवर बंदी घातली. म्यानमारमधील इंटरसेवेचे नियंत्रण करणारी ‘नेटब्लॉक्स’ने दिलेल्या माहितीनुसार स्थानिक वेळेनुसार आज सकाळी दहा वाजल्यापासून ही बंदी घातली आहे.