शिरुर तालुक्यातील करडे घाटातील बेवारस गाडीचे ‘रहस्य’ उलघडले, मुलाने वापरली होती पित्याच्या खूनासाठी

शिक्रापुर : पोलीसनामा ऑनलाइन – शिरुर तालुक्यातील करडे घाटात अनेक दिवसापासून एक निळ्या रंगाची बेवारस कार पडल्याचे दिसुन येत होते, पोलिसांचे देखील इतके दिवस त्याकडे लक्ष गेले नाही. अखेरीस या बेवारस कारचे रहस्य आता उलघडे असून ही कार एका मुलाने आपल्या पित्याचा खून करुन या प्रकरणी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रेताची विल्हेवाट लावून त्यानंतर बनाव रचून ही गाडी करडे येथील घाटामध्ये खाली दरीत सोडून देण्यात आली होती. अशा कबुली जबाब आरोपीने दिला आहे.

याबाबतीत मिळालेली माहिती नुसार पारनेर तालुक्यातील निघोज येथे कुकडी नदीपात्रात एका पत्र्याच्या कोठीमध्ये २७ ऑगस्ट रोजी अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. अज्ञात इसमांनी खून करुन प्रेत पेटीत घालून पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने कुकडी नदी पात्रात टाकून दिले होते. याबाबत दामु धोंडीबा घोडे (माजी सरपंच, रा. टाकळी हाजी, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी पारनेर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन कलम ३०२, २०१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पारनेर पोलिसांना याबाबत तपासादरम्यान ११ सप्टेंबर रोजी रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन येथे मयताच्या वर्णनाशी मिळती – जुळती मिसिंग दाखल झाल्याची माहिती मिळाली. पारनेर पोलिस पथकातील कर्मचार्‍यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यातुन माहिती घेतली असता सतिश सदाशिव कोहकडे (वय ४९, रा. कारेगांव, ता. शिरुर, जि. पुणे) हे दि. २५ ऑगस्टपासून मिसिंग असल्याबाबत नोंद आढळून आली.पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांना मयताचे कपडे, करदोरा, हातातील दोरा व मिळून आलेल्या वस्तूंचे फोटो दाखविल्यावर नातेवाईकांनी मयत हा मिसिंग व्यक्तीच असल्याचे ओळखले.

ओळख पटविण्यासाठी मयताचे राखून ठेवलेले शरीराचे घटक तसेच नातेवाईकांच्या डीएनए चाचणी नियोजन करण्यात आले होते.पोलिसांना धागेदोरे मिळताच त्यांनी तपासाची चक्रे फिरवून कारेगांव येथील तांत्रिक व गोपनीय बातमीदाराच्या माहितीवरुन मयताच्या मृत्यूबाबत त्याच्या मुलाकडे सखोल चौकशी केली. सुरुवातीला त्याने टाळाटाळ केली. मात्र, पोलिसांनी कसून चौकशी करताच त्याने वडील आईला योग्य वागणूक देत नसल्याने व घरभाड्याचे व शेतीचे असलेले सर्व पैसे हे वडील त्यांचे अनैतिक संबध असलेल्या दुसर्‍या महिलेवर खर्च करत असल्याचे सांगत यावरुन त्याचे वडीलांशी नेहमी वाद होत असल्याचे सांगितले.

२३ ऑगस्ट रोजी सायंकाळी त्याचे वडीलांशी वाद झाले. तसेच आईला मारहाण केल्याचा राग मनात धरुन मयताचा मुलगा प्रदीप सतिश कोहकडे (रा. कारेगांव, ता. शिरुर, जि. पुणे) याने त्याचे मित्र हर्षल सुभाष कोहकडे, श्रीकांत बाळू पाटोळे (दोघेही रा. कारेगांव) यांच्यासह इतर दोन अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने घरामध्येच डोळ्यात मीरचीची पूड टाकून, तोंड दाबून व कापडी पट्टयाने गळा आवळून खून केल्याचे सांगितले.आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मयताचे प्रेत मारुती कारमध्ये टाकून निघोज येथील कुंडावरील पुलावरुन वाहत्या पाण्यात टाकून दिले.

त्यानंतर बनाव रचून मयताची कार ही शिरुर तालुक्यातील करडे येथील घाटामध्ये खाली दरीत सोडून दिल्याची कबुलीही त्याने दिली. त्यानुसार मुलासह त्याचे मित्र व अल्पवयीन आरोपींना पारनेर पोलिसांनी ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.