‘नाणार’वरून शिवसेनेत दुफळी, 22 शाखा प्रमुखांसह पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाइन – मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्पाचा वाद आता चांगलाच पेटला आहे. प्रकल्प राहणार की जाणार यावरून शिवसेनेत दुफळी निर्माण झाली आहे. नाणारचे समर्थन करणाऱ्या विभागप्रमुखांवर शिवसेनेने केलेल्या कारवाईच्या निषेधार्थ कोकणातील सागवे विभागातील 22 शाखा प्रमुख, उपविभाग प्रमुख आणि पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नाणार रिफायनरी प्रकल्पाला संघटनेच्या नियमानुसार दिलेल्या पाठिंब्यामुळे शिवसेना सागवे विभागप्रमुख राजा काजवे यांची पक्षाकडून तडकाफडकी विभाग प्रमुखपदावरून जिल्हाप्रमुखपदी उचलबांगडी करण्यात आली आहे. शिवसेनेने राजा काजवे यांच्यावर कारवाई केल्याच्या निषेधार्थ विभागातील शाखा प्रमुखांसह पदाधिकाऱ्यांनी सामुहिक राजीनामे दिले आहेत.

दरम्यान, शिवसेनेने पहिल्यापासूनच या प्रकल्पाला विरोध केला आहे. असे असतानाच नाणार प्रकल्पाबाबतची सामनामध्ये जाहिरात छापून आली. त्यामुळे काही नेत्यांनी शिवसेनेच्या भूमिकेवरच शंका उपस्थित केली. मात्र, कोकण दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची भूमिका जाहिरातदार ठरवत नसून ती शिवसेना प्रमुख ठरवितात. आमच्या याआधीही नाणारला विरोध होता आणि आताही तो राहील अशी भूमिका मांडली होती. त्यामुळे वाद शमला होता. परंतु आता पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्याने या वादाला नवे वळण मिळाले आहे.