माणुसकीला सलाम ! सुप्रसिध्द सर्जन व हार्ट स्पेशलिस्टनं हॉस्पिटलमधील लोकांसाठी नेले डबे

पोलीसनामा ऑनलाईन टीम – देशभरात कोरोना विषाणूची दहशत पसरली असताना प्रत्येकजण आपापल्या परीने मदत करण्याचा, जनजागृती करण्याचा प्रयत्न करत आहे. रविवारी जनता कर्फ्यूमुळे संपूर्ण भारतातील लोक घरी बसले होते. कधीही न थांबणारी मुंबईसुद्धा करोनामुळे थांबली होती. मात्र अशा परिस्थितीत माणूसकी थांबली नाही. प्रसिद्ध मराठमोळा फॅशन डिझायनर नचिकेत बर्वे याच्या वडिलांनी हॉस्पिटलमधील सर्व स्टाफ व रुग्णांसाठी घरून जेवणाचा डबा नेउन सर्वांसमोर आदर्शाचे उदाहरण ठेवले आहे.

नचिकेत बर्वेचे वडील हे नामांकित सर्जन व हार्ट स्पेशलिस्ट आहेत. रविवारी जनता कर्फ्यू असताना त्यांनी त्यांच्या हॉस्पिटलमधील सर्व स्टाफ व रुग्णांसाठी घरून जेवणाचा डबा नेला. जनता कर्फ्यूमुळे सर्व सेवा बंद असताना जेवणाची सोय करणे अवघड असल्याची जाणीव त्यांना होती. या जाणीवेपोटी त्यांनी दिवसरात्र रुग्णांची सेवा करणार्‍या कर्मचार्‍यांसाठी व रुग्णांसाठीही जेवणाचा डबा नेला. नचिकेतने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित याबद्दलची माहिती दिली. अशा अडीअडचणीच्या वेळी माझ्या आईने नेहमीच घरी जेवण बनवले. त्यानंतर संपूर्ण स्टाफसाठी डबा पाठवला. 2005 मध्ये आलेल्या पुरातही आईवडिलांनी ही माणुसकी दाखवली, असेही त्याने या पोस्टमध्ये लिहिले आहे.