नेत्यानंतर आता 65 वर्षांचा हत्ती झाला VVIP, सुरक्षेसाठी सैनिक तैनात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजकीय नेत्यांना किंवा महत्वाच्या व्यक्तींना सुरक्षा पुरवलेली आपण नेहमी पाहत असतो. मात्र एखाद्या प्राण्याला अशा प्रकारची सुरक्षा पुरवलेली आपण कधीही पहिली नसेल. मात्र श्रीलंकेत एका हत्तीला अशा प्रकारे सुरक्षा पुरवण्यात आली आहे. या हत्तीला सुरक्षा पुरवण्याचे श्रीलंका सरकारने आदेश दिले आहेत.

या हत्तीचे नाव नंडुनगमुवा राजा असून त्याची उंची जवळपास 10.5 फूट आहे. हा श्रीलंकेमधील सर्वात मोठा पाळीव हत्ती असून त्याचे वय 65 वर्ष आहे. श्रीलंकेमधील पारंपरिक उत्सवादरम्यान तो तेथील रस्त्यांवरून जात असल्याने त्याच्या जीवाला धोका पोहोचू नये म्हणून श्रीलंका सरकारने हा निर्णय घेतला आहे. यासाठी सैन्याच्या खास एका तुकडीची नेमणूक करण्यात आली आहे.

2015 मध्ये एका कार्यक्रमाच्या दरम्यान  या हत्तीची एका दुचाकीस्वाराशी टक्कर होता होता वाचली होती. यामुळे सरकारने याचा व्हिडीओ पाहिल्यानंतर या हत्तीला सुरक्षा पुरवण्याचे आदेश दिले. सैनिकांबरोबरच दोन माहुतांचीं देखील नेमणूक सरकारने केली आहे. हा हत्ती श्रीलंकेत मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे. दरम्यान, गौतम बुद्ध यांचे अवशेष असलेल्या पेटाऱ्याच्या रॅलीदरम्यान या हत्तीला प्रत्येक वर्षी ऑगस्ट महिन्यात 90 किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. या कार्यक्रमात सुमारे १०० हत्ती सहभाग घेतात.