नगर जिल्ह्यात नव्याने 10 जणांना ‘कोरोना’ची लागण, 57 जणांचा अहवाल ‘निगेटिव्ह’

नगर : पोलीसनामा ऑनलाइन –  जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रविवारी (दि.31) एकाच दिवसात नव्याने 10 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 141 वर पोहचली आहे. जिल्ह्यात 61 अॅक्टिव्ह असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आज 57 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली आहे.

आज दिवसभरात सापडेलेल्या रुग्णांमध्ये कर्जत तालुक्यातील राशीन येथील एकाच कुटुंबातील 12 वर्षीय मुलगा आणि 17 वर्षीय मुलगी. राहाता तालुक्यातील ममदापूर बाभळेश्वर येथील 35 वर्षीय पुरुष हा व्यक्ती बाधीत रुग्णाच्या संपर्कात आला होता. संगमनेर तालुक्यात 5 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये कवठे कमळेश्वर येथील 37 वर्षीय पुरुष, विक्रोळी येथून मालुन्जा संगमनेर येथे आलेली 52 वर्षीय महिला आणि संगमनेर शहरातील 27 वर्षीय युवक हे मुंबईहून संगमनेर येथे आले होते. त्यांच्यामध्ये सारीची (श्वसनाचा त्रास) लक्षणे आढळून आली असून त्यांचा कोरोना अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. कोल्हेवाडी रोड संगमनेर येथील 22 व 24 वर्षीय युवक बाधिताच्या संपर्कात आला होता. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे मुंबईहून आलेली 36 वर्षीय महिला. केडगाव अहमदनगर येथील मुंबई येथे कामाला असलेली 28 वर्षीय महिलेचा कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आला आहे.

जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 141 वर पोहचली आहे. यामध्ये महापालिका क्षेत्र 23, अहमदनगर जिल्हा 75, इतर राज्य 02, इतर देशातील 08, इतर जिल्ह्यातील 33 जणांचा समावेश आहे. आतापर्यंत 2437 जणांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 2201 निगेटिव्ह आले आहेत. तर 25 रिजेक्ट करण्यात आले आहेत. 15 जणांचे अहवाल अद्याप आलेले नाही.