अहमदनगर : तिघांविरुद्ध ‘एमपीडीए’चा बडगा : एक वर्षासाठी नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – सराईत रेकॉर्डवरील तीन गुन्हेगारांविरुद्ध ‘एमपीडीए’ कायद्याचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यांना आजपासून एक वर्षासाठी नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवलेला प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील वाळू तस्कर, तसेच धोकादायक व्यक्ती, अवैध धंदे करणारे व रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार यांचे विरुध्द कडक कारवाई करण्याचे संकेत पोलीस अधीक्षकांनी दिलेले होते. त्या अनुषंगाने धोकादायक व्यक्ती व वाळूतस्कर महेंद्र बाजीराव महारनोर (वय २६, रा.डोमाळवाडी, वांगदरी, ता. श्रीगोंदा), अजय ऊर्फ अर्जुन गणेश पाटील (वय २० वर्षे, रा. गांधीनगर, कोपरगाव), सुदाम ऊर्फ दिपक भास्कर खामकर (वय- २८, रा. मांडवे खुर्द ता. पारनेर, जि. अहमदनगर) यांचेविरुध्द एमपीडीए कायद्यांतर्गत कोपरगाव शहर, घारगाव, श्रीगोंदा पोलीस स्टेशन यांनी पाठविलेल्या प्रस्तावावर जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी अंतीम निर्णय घेवून तिघांना दि.०६/०९/२०१९ रोजी पासून एक वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश पारित केले आहेत.

त्यावरुन सदर स्थानबध्द व्यक्ती महेंद्र बाजीराव महारनोर (वय.२६ वर्षे रा. डोमाळवाडी, वांगदरी ता. श्रीगोंदा), अजय उर्फ अर्जुन गणेश पाटील (वय २० वर्षे,रा. गांधीनगर, कोपरगाव जि. अहमदनगर), सुदाम ऊर्फ दिपक भास्कर खामकर (वय- २८ रा. मांडवे खुर्द ता. पारनेर जि. अहमदनगर) यांना पोलीस अधिक्षक ईशू सिंधू यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार, श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलत जाधव, घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांचे पथकांतील अधिकारी व कर्मचारी यांनी ताब्यात घेवून त्यांना एक वर्षाकरीता नाशिक मध्यवर्ती कारागृह, नाशिक येथे स्थानबध्द (अटक) करण्यात आले आहे.