अजित पवारांचा पालकमंत्री राम शिंदेंवर ‘घणाघात’, म्हणाले….

जामखेड :  पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभेची घोषणा झाल्यापासून सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षात आरोप प्रत्त्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत. १९९५ साली MIDC आणण्याचे फलक जामखेडमध्ये लावले होते पण, अजूनही MIDC आली नाही. अहमदनगरच्या पालकमंत्र्यांना काही कळतं का नाही ? मंजूर न झालेल्या कामांचंही भूमिपूजन करण्याचा सपाटा लावलाय अशा शब्दात राज्याचे माजी उपुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेत असलेले कर्जत जामखेडचे आमदार आणि अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे यांच्यावर चांगलीच टीका केली आहे.

कर्जत जामखेडमध्ये घेण्यात आलेल्या निर्धार सभेत अजित पवार बोलत होते. इतकी वर्षे इथल्या आमदारांनी कर्जत-जामखेडमध्ये विकासात्मक बदल घडवले नाहीत. आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सत्ताधाऱ्यांचे उमेदवार तुमच्याकडे येतील; चुका पदरात घाला सांगून एक संधी पुन्हा मागतील. पण या दळभद्री सरकारवर विश्वास ठेऊ नका अशा प्रकारची सडकून टीका अजित पवारांनी यावेळी सत्ताधारी पक्षावर केली.

रोहित पवारांबाबत काय म्हणाले अजित पवार ?
रोहित पवार हे अनेक दिवसांपासून कर्जत जामखेडच्या मतदारसंघात तळ ठोकून आहेत त्यांच्या प्रचारार्थ या सभेचे आयोजन केले गेले होते. काही लोक टीका करतील की, रोहित बाहेरचा आहे. पण अशांना मी सांगू इच्छितो की, आतल्यांना कर्जत-जामखेडचा विकास जमला नाही तर, बाहेरच्याना येऊन विकास आणला त्यात बिघडलं कुठे ! माझ्या जिवाभावाच्या कार्यकर्त्यांनी मला साथ दिली, म्हणून बारामतीचा विकास झाला. तुम्ही पण रोहितला साथ द्या असे आवाहन यावेळी अजित पवार यांनी केले.

Visit : Policenama.com