महिलेची 21 लाखांची ऑनलाईन फसवणूक, इंग्लंडच्या एकासह तोतया कस्टम अधिकार्‍याविरुद्ध गुन्हा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – फेसबुक वरून ओळख करून मोबाईल नंबर घेऊन महिलेला 21 लाख रुपयांचा ऑनलाइन गंडा घातला. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात इंग्लंडमधील एक व तोतया महिला कस्टम अधिकाऱ्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये डॉक्टर मार्क हॅरिलेके (युके) व तोतया अनोळखी कस्टम अधिकारी यांचा समावेश आहे. याबाबत माहिती अशी की, पुष्‍पलता पांडुरंग जरे (रा. जामखेड, जि. नगर) यांना डॉ. मार्क फेसबुकवरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. ऑनलाइन चॅटिंग करून फोन नंबर मिळवला. त्यानंतर तुमच्या मुलांना लॅपटॉप व मोबाईल पाठवत असल्याचे सांगून पैसे भरण्यास सांगितले. 50 हजार पौंड स्कॅन झाल्याची बतावणी करून तोतया महिला कस्टम अधिकाऱ्यांनी संपर्क केला. त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन वेगवेगळ्या बँक अकाऊंटवर 21 लाख 41 हजार 275 रुपये पाठविले.

फसवणूक झाल्याचे लक्षात येतात पुष्पलता जरे यांनी नगरच्या सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अरूण परदेशी हे करीत आहेत.