‘पब्जी गेम’च्या व्यसनात युवकाचा मृत्यू

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – पबजी गेम खेळण्याचा व्यसनातून कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील युवक सुयोग अरुण क्षीरसागर (वय 23) या तरुणाने जीव गमविला आहे. सुमारे पंधरा दिवसापासून त्याचे मनस्वास्थ्य बिघडले होते.

याबाबत माहिती अशी की, मिरजगाव येथील व्यावसायिक अरुण क्षीरसागर यांचा मुलगा सुयोग याला गेल्या वर्षापासून पबजी गेमचं व्यसन लागले होते. सुयोग हा सुशिक्षित तरुण होता. बारावीच्या शिक्षणानंतर वडिलांच्या व्यवसायात मदत करू लागला होता.

एक चांगला कुशल कारागीर बनला होता. गेली दोन वर्षांमध्ये अँड्रॉईड मोबाईल खरेदी करून इतर मित्राचे पाहून पबजी गेम खेळण्यास शिकला. इतर मित्राच्या बरोबरीने खेळतांना पाहुन त्यालाही हळुहळू पबजी खेळण्याचे व्यसन लागले.

दुकानामधून मोकळा वेळ मिळाला असताच तो पबजी गेम मध्ये व्यग्र असायचा. गेल्या पंधरा दिवसांपासून तो मनोरुग्ण अवस्थेत काहीही बोलत असे व गावामध्ये रात्रं दिवस फिरत असे. आठ दिवसापूर्वी त्याचे पालक अरुण क्षीरसागर यांनी त्याला नगर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते, परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही, अखेर त्याची प्राणजोत मालवली.

Visit : Policenama.com