अहमदनगर : मुलाच्या आत्महत्येनंतर पित्याचाही मृत्यू

 अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – कर्जबाजारीपणाला कंटाळून मुलाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. मुलाच्या आत्महत्येचे वृत्त सहन न झाल्यामुळे धक्का बसून पित्याचाही मृत्यू झाला. आज श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव येथे ही घटना घडली.

मुलगा धनाजी संपत धेंडे ( वय 46), पिता संपत नामदेव धेंडे ( वय 62) ही मयतांची नावे आहेत. याबाबत माहिती अशी की, धनाजी धेंडे यांनी शेतीसाठी सोसायटीचे घेतले होते. मागील काही महिन्यांपूर्वी मुलीचा साखरपुडा झाला होता. घरात लग्नाची तयारी चालू होती.

पण लग्नाला पैसे नव्हते. पैशाची चिंता व कर्ज यामुळे धनाजी धेंडे यांनी गुरूवारी विष प्राशन केले. श्रीगोंदा येथील खाजगी रुग्णालयात उपचार चालू असताना शनिवारी रात्री एक वाजता त्यांचे निधन झाले.

मुलाच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर धक्क्याने पित्याचाही मृत्यू झाला. याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/