पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवा, खासदार सुजय विखे यांची मागणी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्याला दुष्काळातून मुक्त करण्यासाठी पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवावे, अशी मागणी भाजप खासदार सुजय विखे यांनी केली आहे. तसेच शेतकऱ्यांना प्रति हेक्‍टरी 50 हजारांची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनात नियम 193 अन्वये कृषी विभागावरील चर्चेत सहभाग घेताना खासदार विखे यांनी राज्यातील शेती व शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सभागृहाचे लक्ष वेधले. अवकाळी पावसाने राज्यात 54 लाख हेक्टर क्षेत्रावरील कांदा, सोयाबीन, बाजरी, ज्वारी आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे.

राज्य सरकारने खरीप व रब्बी पिकांसाठी हेक्टरी 7 हजार रुपये आणि फळबागांसाठी 16 ते 18 हजार रूपयांचे अनुदान जाहीर केले असले, तरी यातून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार नाही. राज्यात नव्याने स्थापन झालेल्या तीन पक्षांच्या सरकारने सत्तेत येण्यापूर्वी केलेल्या घोषणांची अंमलबजावणी करून, शेतकऱ्याना तातडीने हेक्टरी 50 हजारांचे अनुदान देण्याची मागणी केली.

विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांच्या होणाऱ्या अडवणुकीकडे खासदार विखे यांन सभागृहाचे लक्ष वेधले. विमा रकमे इतका खर्च कंपन्याच्या कार्यालयात हेलपाटे मारण्यासाठी होतो. विमा कंपन्याच्या एजंटची अपुरी संख्या या समस्येला कारणीभूत असल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली.

Visit : Policenama.com