अभियंते बेमुदत सामूहिक रजेवर ; शहर अभियंत्यांना बूट फेकून मारण्याचा तीव्र निषेध

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन – महापालिकेचे शहर अभियंता विलास सोनटक्के यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ, दमदाटी करत बूट फेकून मारल्याच्या घटनेचा सर्व अभियंत्यांनी तीव्र निषेध केला. महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन सामूहिक रजेवर जाणार असल्याचा इशारा दिला आहे. या घटनेवरून सर्व अभियंते आक्रमक झाले आहेत.

महापालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांना निवेदन देतेवेळी शहर अभियंता व्ही.जी. सोनटक्के, यंत्र अभियंता पी.जे.निकम, पाणी पुरवठा विभागाचे एम.डी.काकडे, अतिक्रमण विभाग प्रमुख एस.के. इथापे, प्रकल्प अभियंता आर.जी.मेहेत्रे, शाखा अभियंता के.बाय बल्लाळ, एस.आर.निंबाळकर, एम.एस.पारखे, गणेश गाडळकर आदी उपस्थित होते.

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आज आयुक्त यांचे कार्यालयात प्रभारी शहर अभियंता व्ही.जी.सोनटक्के यांना कार्यालयीन कामकाजासाठी बोलावले असता त्यांचे दालनामध्ये नागापुर बोल्हेगांव भागातील प्रभाग क्र.7 चे नगरसेवक अशोक बडे, निलेश भाकरे व माजी नगरसेवक दत्तात्रय सप्रे व माजी आमदार अनिल राठोड व इतर 25 ते 30 कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी बोल्हेगांव भागातील एका रस्त्याचे काम बाबत विचारणा केली असता त्यांना वस्तुस्थिती नमुद करुन त्या कामाची माहिती देत असताना त्यांनी बूट फेकून मारला होता. ही घटना शहरातील अभियंत्यावर दहशत निर्माण करणारी आहे. याचा निषेध करण्यासाठी सामूहिक रजेवर जाण्याचा इशारा दिला आहे.