अग्‍नीशस्त्रे बाळगणार्‍या चाकण येथील नगरसेवकासह दोघांना नगरमध्ये अटक

20 लाख 58 हजार रूपयाचा ऐवज जप्‍त

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – बेकायदेशीररित्या अग्‍नीशस्त्रे बाळगणार्‍या चाकण येथील नगरसेवकासह दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून एक देशी बनावटीचा गावठी कट्टा, देशी बनावटीच्या पिस्टलचे मॅगझीन, दोन जिवंत काडतुस, दोन मोबाईल आणि फॉर्म्युनर कार असा एकुण 20 लाख 58 हजार रूपयाचा ऐवज जप्‍त करण्यात आला आहे.

राहूल किसन कांडगे (36, रा. जय भारत चौक, मार्केटयार्ड, चाकण, ता. खेड) आणि अश्पाक महमंद शेख (34, रा. चाकण-कोरेगांव रोड, पिंपळगांव) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस निरीक्षक दिलीप पवार, उपनिरीक्षक सचिन खामगळ, कर्मचारी सोन्याबापू नानेकर, दत्‍तात्रय हींगडे, रविंद्र कर्डिले, संतोष लोंढे, आण्णा पवार, विजय ठोंबरे, राहूल सोळुंके, संदीप दरंदरले, मयूर गायकवाड, संदीप चव्हाण आणि चालक बबन बेरड हे गस्तीवर होते. त्यावेळी पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मनमाड-नगर रोडवरून नगरच्या दिशेने जाणार्‍या एका पांढर्‍या रंगाच्या फॉर्च्युनर गाडीमधील व्यक्‍तीकडे गावठी कट्टा आहे. त्यानंतर पोलिसांनी विळद घाट, निंबळक बायपास चौकात बॅरिकेटस् लावून सापळा रचला. काही वेळातच फॉर्च्युनर कार तेथे आल्यानंतर पोलिसांनी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास फॉर्च्युनर थांबविली.

पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे अनुक्रमे राहुल कांडगे आणि अश्पाक शेख अशी असल्याचे सांगितले. पोलिसांनी पंचासमक्ष गाडीची झडती घेतली असता त्यामध्ये देशी बनावटीचे पिस्टल (गावठी कट्टा), मॅगझीन आणि दोन जिवंत काडतुसे आढळुन आली. पोलिसांनी फॉर्च्युनर कारसह अग्‍नीशस्त्रे जप्‍त केली आणि दोघांविरूध्द एमआयडीसी पोलिस ठत्तण्यात आर्म अ‍ॅक्ट कलम 3/25 अन्वये गुन्हा दाखल केला. आरोपी राहूल किसन कांडगे हा चाकण येथील नगरसेवक असून त्याच्याविरूध्द यापुर्वी चाकण पोलिस ठाण्यात 5 गंभीर गुन्हयांची नोंद आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक ईशू सिंधु, अप्पर अधीक्षक सागर पाटील आणि सहाय्यक पोलिस अधीक्षक मनिष कलवानिया यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. चाकण येथील नगरसेवकास गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसांसह पोलिसांनी अटक केल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.