औरंगाबाद,अहमदनगर जिल्हयात जबरी चोर्‍या करणार्‍यांना फिल्मी स्टाईलने पाठलाग करून पकडले ; 10 लाख 34 हजाराचा ऐवज जप्‍त

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – औरंगाबाद आणि अहमदनगर जिल्हयात जबरी चोर्‍या करून धुमाकूळ घालणार्‍या टोळीला अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) अटक केली असुन त्यांच्याकडून तब्बल 10 लाख 34 हजार रूपयाचा ऐवज जप्‍त केला आहे. त्यांच्याकडून 7 गंभीर गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

एरीयल उर्फ आर्यन कांतीलाल काळे (20, रा. लिंबे जळगाव, ता. गंगापुर, जि. औरंगाबाद), सुंदरसिंग उर्फ गुलब्या शिवाजी भोसले (रा. गोंडेगाव, ता. नेवासा, जि. अहमदनगर) आणि सुनिल बाबाखान भोसले (28, रा. गोंडेगाव, ता. नेवासा) आणि श्रावण रतन चव्हाण (20, रा. टेलगेट, तालखेड, ता. माजलगाव, जि. बीड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचा साथीदार अजय मिरीलाल काळे (रा. गाढवनाला भानसहीवरा, ता. नेवासा) हा फरार असुन पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

आरोपींकडून नेवासा, शनि शिंगणापुर, वैजापुर, गंगापुर, वाळुंज आणि विरगाव या पोलिस ठाण्यात दाखल असलेले एकुण 7 गुन्हे उघडकीस आले आहेत. शनिवारी पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना त्यांच्या खबर्‍याकडून माहिती मिळाली होती की, नेवासा तालुक्यातील देवगट फाटा येथे ट्रक चालकास चाकुच्या धाकाने लुटणारा एरियल हा त्याच्या साथीदारांसह खुणेगाव वनीकरण परिसरात स्वीप्ट कारमुधन आलेला आहे. पोलिसांनी अधिक माहिती काढली असता आरोपी तेथे येणार असल्याची खात्री त्यांना पटली. त्याबाबत वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांना सांगण्यात आले.

पोलिस अधीक्षक ईशू सिंधु, अप्पर अधीक्षक रोहीदास पवार, सागर पाटील, उपविभागीय अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दिलीप पवार, सहाय्यक निरीक्षक संदीप पाटील, पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश फडतरे, सचिन खामगळ, रोहन खंडागळे, कर्मचारी दत्‍तात्रय हिंगडे, बबन मखरे, मल्‍लीकार्जुन बनकर, दिगंबर कारखेले, रविंद्र कर्डिले, रविकिरण सोनटक्के, विनोद मासाळकर, दत्‍ता गव्हाणे, योगेश सातपुते, संदीप घोडके, विजय ठोंबरे, मच्छिंद्र बर्डे, रोहित मिसाळ, रोहिदास नवगिरे, चालक सचिन कोळेकर, सचिन मिरपगार, बाळासाहेब भोपळे तसेच नेवासा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रणजित डेरे, शेवगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रामराव ढिकले, साईचे सहाय्यक निरीक्षक देशमाने आणि त्यांच्या सहकार्‍यांनी खुणेगाव वनीकरणाजवळ नेवासा येथे जावुन पुन्हा मिळालेल्या माहितीची खातरजमा केली.

संशयित एरियल आणि त्याचे सहकारी डाळींबाच्या बागेत लपलेले दिसले असता पोलिसांनी त्यांचा फिल्मी स्टाईल पाठलाग करून त्यांचा पकडले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी औरंगाबाद आणि अहमदनगर जिल्हयात गंभीर गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून 7 गंभीर गुन्हे उघडकीस झाले आहेत. आरोपी एरियल याच्याविरूध्द 2 तर आरोपीं सुंदरसिंग भोसले याच्याविरूध्द 8 गंभीर गुन्हयांची नोंद आहे.

पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातील स्वीप्ट कार, विविध कंपनीचे 8 मोबाईल, यामाहा कंपनीची मोटारसायकल आणि रोख 27 हजार रूपये असा एकुण 10 लाख 34 हजार रूपायाचा ऐवज जप्‍त केला. गुन्हयाचा पुढील तपास नेवासा पोलिस ठाण्यातील अधिकारी करीत आहेत.