अहमदनगर : गुंडावर नोटा उधळणारा ‘तो’ पोलीस निलंबित (व्हिडीओ)

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – ड्युटीवर असताना साध्या वेशातील पोलिस कर्मचाऱ्याने सराईत गुंडावर पैशाची उधळपट्टी केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यावरून कोतवाली पोलिस ठाण्याच्या पोलिस कर्मचारी शकील सय्यद याला निलंबित करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक ईशू सिंधू यांनी आज हा आदेश काढला आहे.

गेल्या आठवड्यात नगर शहरात मोहरम विसर्जन मिरवणूक निघाली होती. त्यात नगर शहरातून दोन वर्षांसाठी हद्दपार केलेला गुन्हेगार रशिद अब्दुल अजिज उर्फ रशिद दंडा हा गुन्हेगार सहभागी झाला होता. त्यावेळी बंदोबस्ताला असलेला कोतवाली पोलीस स्टेशनचा साध्या वेशातील पोलीस कर्मचारी शकील सय्यद याने गुन्हेगार रशिद दंडा याच्यावर पैसे ओवाळत असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता.

दंडा याला घरगुती कारणास्तव काही दिवस तडीपारीतून 10 दिवसांसाठी सूट देण्यात आली असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली. परंतु पोलीस कर्मचारीच गुंडाच्या अंगावर पैसे ओवाळत असल्याच्या व्हिडिओमुळे हा पोलीस कर्मचारी अडचणीत आला आहे. साध्या वेशातील पोलिस कर्मचारी तडीपार गुंडावर पैसे ओवाळत असल्याचे या व्हिडिओत दिसत होते. अखेर त्याला निलंबित करण्यात आले आहे.

Visit – policenama.com 

 

You might also like