राष्ट्रीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत उदिथ व लिखिता चॅम्पीयन, महाराष्ट्राला सांघिक विजेतेपद

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – गेल्या चार दिवसापासून नगरच्या वाडीयापार्क येथील बॅडमिंटन हॉल मध्ये सुरु असलेल्या ६५ व्या राष्ट्रीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेचे आज सकाळी अंतिम सामने झाले. मुलांच्या अंतिम सामन्यात केरळच्या एन.पी.उदिथ याने दिल्लीच्य शौर्य सिंग याचा 21-17, 22-20 अशा सरळ सेटमध्ये पराभव करून मुलांमधील अजिंक्यपद पटवले. तर मुलींच्या अंतिम सामन्यात डी.ए.व्ही. कॉलेजच्या लिखिता श्रीवास्तव हिने महाराष्ट्राच्या रुद्रा राणे हिच्यावर 21-17, 23-21 अशा सरळ सेटमध्ये पराभव करत मुलींमधील अजिंक्यपद पटवले. अंतिम फेरीतील झालेले हे दोन्ही सामने सुरशीचे व हाय होलटेज झाले.

तत्पूर्वी झालेल्या उपांत्य सामन्यांमध्ये मात्र महाराष्ट्राच्या खेळाडूंनी निराशा केली. उपांत्य फेरीत महाराष्ट्राच्या रोहन थूल याचा केरळच्या एन.पी.उदिथ याने 21-5, 14-21, 21-16 अशा सेटमध्ये पराभव केला. तसेच महाराष्ट्राच्याच तनिष्क सक्सेना याचा दिलीच्य शौर्य सिंग याने 20-22, 21-16, 21-12 अशा सेटमध्ये पराभव केला. मुलींच्या उपांत्य सामन्यांमध्ये महाराष्ट्राच्या रुद्रा राणे हिने देविका कावळे हिला 21-19, 21-18 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला.

अंतिम सामन्यानंतर स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ झाला. स्पर्धेचा अंतिम निकाल पुढीलप्रमाणे

वैयक्तिक सामने (मुले) – प्रथम ए.पी.उदिथ केरळ, द्वितीय शौर्य सिंग दिल्ली, तृतीय रोहन थूल महाराष्ट्र. वैयक्तिक सामने (मुली) – प्रथम लिखिता श्रीवास्तव डी.ए.व्ही. कॉलेज, द्वितीय रुद्रा राणे महाराष्ट्र, तृतीय दुर्वा गुप्ता दिल्ली.

उत्कृष्ठ खेळाडू – ए.पी.उदिथ (मुले), लिखिता श्रीवास्तव (मुली) व स्पर्धेतील उत्कृष्ठ खेळाडू रोहन थूल. सांघिक विजेतेपद – प्रथम महाराष्ट्र संघ, द्वितीय कर्नाटक संघ, तृतीय डी.ए.व्ही. कॉलेज संघ

विजेत्या संघाना व खेळाडूंना महापौर बाबासाहेब वाकळे, बारामतीच्या अ‍ॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट च्या विश्वस्त सुनंदा पवार, प्रशिक्षनार्थी पोलीस अधिक्षक आर्चित चांडक, अपधिक्षक संदीप मिटके यांच्या हस्ते करंडक व सुवर्ण, रौप्य व कांस्यपदक तसेच गेम कीट देण्यात आले. यावेळी स्कूल गेम फेडरेशनचे अध्यक्ष अजय मिश्रा, आरोग्याधिकारी डॉ.अनिल बोरगे, सौ. प्रियांका मिटके, केंद्रीय विद्यालयाच्या प्राचार्या मंजुषा राणा, जिल्हा क्रीडा अधिकारी व स्पर्धा संयोजक कविता नावंदे, चीफ रेफ्री नरेंद्र सावर्डेकर, सुभाष नावंडे आदींसह सर्व संघांचे प्रशिक्षक, खेळाडू व बॅडमिंटन प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्वांनी विजेत्या खेळाडूंचे व संघांचे कौतुक केले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/