पिंपरी : नगर अर्बन बँकेची तब्बल 22 कोटींची फसवणूक

पिंपरीः पोलीसनामा ऑनलाईन – कर्जासाठी मिळकतीचे बनावट मूल्यांकन सादर करून नगर अर्बन को. ऑप. बँकेच्या चिंचवड शाखेची तब्बल 22 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 26 मार्च 2018 ते 25 जानेवारी 2021 या दरम्यान घडला आहे. याप्रकरणी कर्ज उपसमिती सदस्य, बँकेचे संचालक मंडळ सदस्यांसह आणखी सहा जणांच्या विरोधात चिंचवड पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.

महादेव पंढरीनाथ साळवे (56 रा. सावेडी, अहमदनगर) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी बबन निवृत्ती चव्हाण, वंदना बबन चव्हाण, यज्ञेश बबन चव्हाण (तिघेही रा. संभाजीनगर, चिंचवड), मुंजदेवी हरीमोहन प्रसाद (रा. शाहूनगर, चिंचवड), रामचंद्र अण्णासाहेब तांबिले (रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), अभिजित नाथा घुले, (रा. बुरूडगाव रोड, अहमदनगर), कर्ज उपसमितीचे सदस्य, नगर अर्बन को. ऑप. बँकेचे संचालक मंडळ सदस्य अशी गुन्हा दाखल केलेल्या आरोपीची नावे आहेत.

चिंंचवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मे. नेश लीब टेक्‍नोरिअर आणि मे. इंडियन इंजिनिअरिंग इंडस्ट्री पुणे या कंपनीच्या कर्जदार आरोपीनी आपसांत संगनमत करून स्वतःच्या फायद्यासाठी कर्ज प्रकरणामध्ये तारण गहाण मिळकतीचे बनावट मूल्यांकन अहवाल तयार केला. या अहवालाच्या आधारे कर्ज उपसमिती आणि संचालक मंडळाच्या सदस्यांनी बँकेची 22 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. तपास पोलीस निरीक्षक विश्‍वजीत खुळे करीत आहेत.