पिंपरी- चिंचवड पोलिसांची अहमदनगरमध्ये छापेमारी, नगर अर्बन बँकेच्या माजी संचालकांची धरपकड

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – नगर अर्बन बँकेच्या पिंपरी-चिंचवड शाखेत तब्बल 22 कोटीच्या बोगस कर्जप्रकरणात आरोपी असलेल्या तत्कालीन संचालकांची पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे. त्यानुसार पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी (दि. 6) पहाटे नगरमध्ये छापे टाकून तत्कालीन संचालक नवनीत सुरापुरिया यांच्यासह दोघांना ताब्यात घेतले आहे. अन्य आरोपी मात्र अद्याप हाती लागलेले नाहीत. पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

बँकेचे अधिकारी महादेव पंढरीनाथ साळवे (वय रा. नगर) यांनी फिर्याद दिली आहे. भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांच्या अध्यक्षपदाच्या काळात हा गैरप्रकार झाल्याचा आरोप आहे. 26 मार्च 2018 ते 25 जानेवारी 2021 या काळात हा गुन्हा घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बँकेच्या पिंपरी-चिंचवड शाखेत प्रत्येकी 11 कोटी रुपयांची दोन बोगस कर्ज प्रकरणे केली होती. मिळकतीचे बनावट मूल्यांकन सादर करून बँकेची फसवणूक केली होती. त्यानुसार कर्ज उपसमिती सदस्य, बँकेचे संचालक मंडळ सदस्यांसह आणखी 6 जणांच्या विरोधात चिंचवड पोलीसात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. कर्ज घेणाऱ्या यज्ञेश चव्हाण याला पोलिसांनी अटक केली आहे. तर बबन निवृत्ती चव्हाण, वंदना बबन चव्हाण, यज्ञेश बबन चव्हाण (तिघेही रा. चिंचवड), मंजुदेवी हरीमोहन प्रसाद (रा. शाहूनगर, चिंचवड), रामचंद्र अण्णासाहेब तांबिले (रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड), अभिजित नाथा घुले (रा. बुरूडगाव रोड, नगर), कर्ज उपसमितीचे सदस्य, नगर अर्बन को. ऑप. बँकेचे संचालक मंडळ सदस्य यांच्याविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.