अहमदनगर महापालिका निवडणुक : ६८ जागांसाठी ७१५ अर्ज 

अहमदनगर  : पोलीसनामा ऑनलाईन  – अहमदनगर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या आखाड्यात ६८ जागांसाठी ७१५ लोक आपले नशीब अजमावत आहेत. उमेदवारीचे सोमवार अखेर २२२ अर्ज आले होते तर अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे काल मंगळवारी ४९३ अर्ज दाखल झाले. २२ तारखेला म्हणजे गुरुवारी या अर्जाची छाननी होणार असून २६ तारीख हि अर्ज मागे घ्यायची अंतिम तारीख आहे. म्हणून या निवडणुकीचे चित्र २६ तारखेलाच स्पष्ट होणार आहे.

अहमदनगर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये १७ प्रभागातून ६८ नगरसेवक हे महानगर पालिकेवर निवडले जाणार आहेत. महानगरपालिके निवडणुकीत ६८ जागांसाठी ९ डिसेंबर रोजी मतदान होणार असून या निवडणुकीचचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कार्यक्रम १३ ते २० नोव्हेंबर या दरम्यान पार पडला आहे. शहरातील सावेडी प्रभाग समिती कार्यालय व माळीवाडा प्रभाग समिती कार्यालय प्रत्येकी दोन तर बुरूडगाव प्रभाग समिती कार्यालय व केडगाव मनपा उपप्रभाग समिती कार्यालय येथे प्रत्येक एक कक्ष उमेदवारी अर्ज स्वीकारण्यासाठी उभारण्यात आला होता. उमेदवारांना आता ऑनलाईन पध्द्तीने उमेदवारी अर्ज भरून हार्डकॉपी अर्ज स्वीकारणी कक्षावर जाऊन जमा करायचा होती. उमेदवारी अर्ज भरण्याच्या मधल्या काळात दोन दिवस ऑनलाईन यंत्रणा सर्व्हर डाऊन झाल्यामुळे अर्ज भरण्याचे काम खोळंबले होते. त्यानंतर ऑफलाईन उमेदवारी अर्ज स्वीकारण्याची सूचना निवडणूक आयोगाने दिल्याने अर्ज दाखल करण्याची लगबग प्रभागातील कक्षात वाढली. काल दुपारी ३ वाजे पर्यंत अर्ज भरण्याची मुदत असल्याने क्षत्रिय कार्यालयाच्या कक्षावर प्रचंड गर्दी उसळल्याचे चित्र काल पाहण्यास मिळाले. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी क्षत्रिय कार्यालयावर असलेल्या रेलचेली मुळे उमेदवारांचा एकूण आकडा काढण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्यांना रात्र झाली.

अहमदनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी करून लढत आहे तर सेना भाजप पहिल्यांदाच स्वतंत्र लढत असल्याने प्रत्येक प्रभागात तिरंगी लढत होणार असल्याचे बोलले जाते आहे. तर सर्व पक्षांकडून आपल्या पक्षाच्या सर्वच उमेदवारांना एबी फॉर्म दिले गेले आहेत. तर काही ठिकाणी एका पक्षाने दोन व्यक्तींना एबी फॉर्म दिल्याने छाननी दिवशी चांगलीच गरबड उडणार असल्याची चर्चा काल नगर मध्ये रंगली होती. अहमदनगरची सत्ता कोणाकडे जाणार याकडे सर्वांचे सर्वांचे लक्ष लागले असून येत्या काळात सत्ता संपादनाच्या दृष्टीने तिन्ही पक्ष चांगलीच रस्सीखेच करणार असल्याचे समजते आहे.

अंदमानमध्ये आदिवासींनी केली पयर्टकाची हत्या…