Nagpur News : दारू पाजून 22 वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार; ‘डान्स’ शिक्षक रोमियो गोडबोले ‘गोत्यात’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन –  नागपूरमधील अजनी या भागात एक खळबळजनक घटना घडली आहे. यामध्ये एका नृत्य शिक्षकाने तणाव दूर करण्याच्या बहाण्याने एका २२ वर्षीय तरुणीला दारू पाजून तिच्यावर अत्याचार केला आहे. त्यानंतर अजनी पोलिसांनी अत्याचारासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून शिक्षकाला अटक केली आहे. त्या अटक केलेल्या शिक्षकाचे नाव रोमियो गजानन गोडबोले असे आहे.

पीडित विद्यार्थिनी हि वर्धा येथील रहिवाशी असून तिने अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आहे. सध्या ती स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहे. काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर त्या तरुणीची रोमियो गजानन गोडबोले या व्यक्तीशी ओळख झाली होती. स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासामुळे ती तणावात होती. यामुळे गोडबोले याने तिला तणावमुक्त करण्याचे आश्वासन दिले होते. गोडबोले हा धुळवडीच्या दिवशी तरुणीच्या फ्लॅटवर गेला तेव्हा त्याने त्या तरुणीला दारू पाजली.

त्यानंतर ती मद्यधुंद अवस्थेत असताना गोडबोले याने तिच्यावर अत्याचार केला तसेच त्याने मोबाइलमध्ये तिचे अश्लील छायाचित्र देखील काढले. काही वेळाने ती तरुणी शुद्धीवर आल्यानंतर तिने गोडबोले याला त्याचा जाब विचारला. तेव्हा त्याने छायाचित्र व्हायरल करण्याची धमकी दिली. यानंतर तरुणीने नागपुरातील एका नातेवाइकाला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर त्या तरुणीने नातेवाइकासोबत अजनी पोलिस स्टेशनमध्ये गोडबोले विरुद्ध तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी अत्याचार, अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.