अजय देवगणचा ‘दृश्यम’ पाहून केला खून, धाब्याच्या पाठीमागं पुरली ‘डेडबॉडी’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या तरुणाचा खून केल्यानंतर त्याच्या बाईकसह त्याला 10 फूट खड्यात पुरले. ही घटना पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कापसीत घडली. डिसेंबरमध्ये घडलेल्या या घटनेचा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पर्दाफाश करून सुत्रधारासह तीन आरोपींना अटक केली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, अजय देवगण याचा 2015 मध्ये ‘दृष्यम’ हा चित्रपट प्रदर्शीत झाला होता. आरोपींनी हा चित्रपट पाहून कापसी येथील तरुणाचा खून करून त्याचा मृतदेह आणि त्याच्या दुचाकीसह धाब्याच्या पाठिमागे 10 फूट खड्ड्यात पुरला.

पंकज दिलीप गिरमकर (वय-32 रा. समतानगर, वर्धा) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर अमरसिंह उर्फ ललू जोगंद्रसिंह ठाकूर (वय-24 रा. कापसी), मनोज उर्फ मुन्ना रामप्रवेश तिवारी (वय-37 रा. बक्सर, बिहार) आणि शुभम उर्फ तुषार राकेश डोंगरे (वय-28 रा. इमामवाडा) यांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. अमरसिंह हा या गुन्ह्यातील मुख्य सुत्रधार असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर आरोपींचा आणखी एक साथीदार फरार आहे.

अप्पर पोलीस आयुक्त नीलेश भरणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, मृत पंकज गिरमकर हा कापसीच्या हल्दीराम फॅक्टरीत इलेक्ट्रिशियनचे काम करत होता. तो मूळचा वर्धा येथील आहे. तो पत्नीसोबत कापसी येथे रहात होता. याच परिसरात मुख्य आरोपी अमरसिंह याचे दोन धाबे आहेत. पत्नी आजारी असल्याने पंकज अमरसिंहच्या धाब्यावरून डबा आणत होता. दरम्यान त्यांच्यात मैत्री झाली. याचा फायदा घेऊन अमर हा पंकजच्या पत्नीच्या संपर्कात आला. दोघांमध्ये चँटिंग आणि भेटी वाढल्या. पंकजला हे समजल्यावर त्याने अमरसिंहला समजावण्याचा प्रयत्न केला. तो ऐकत नसल्याने पकंज पत्नीला घेऊन वर्धा येथे निघून गेला. यामुळे अमरसिंह संतापला होता. दरम्यान 28 डिसेंबरला पंकज आरोपीच्या धाब्यावर आला. त्याने दोघांतील प्रेमसबंध संपवण्यास सांगितले. यावरून अमरसिंह आणि पंकज यांच्या वाद झाले. याच वादातून आरोपीने पंकजच्या डोक्यात हातोडा मारून त्याचा खून केला.

आरोपीने इतर साथीदारांच्या मदतीने धाब्याच्या पाठिमागे दहा फूट खोल खड्डा खोदून त्यामध्ये पंकज आणि त्याची दुचाकी पुरली. पोलिसांनी मुख्य आरोपी अमर सिंह याच्यासह त्याचा आचारी मनोज तिवारी आणि तुषार डोंगरे याला अटक केली. त्यांच्यावर खून आणि पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.