धक्कादायक ! कोरोनाग्रस्त वृध्दाची ऑक्सिजन मास्कच्या वायरने गळफास घेऊन हॉस्पीटलमध्येच आत्महत्या

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – कोरोनावर उपचार घेणाऱ्या एका वृद्धाने ऑक्सिजन मास्कच्या वायरने रुग्णालयातच गळफास लावून आत्महत्या केली. नागपूर येथील शासकीय रुग्णालयाच्या बेसमेंटमध्ये सोमवारी (दि. 29) सांयकाळी ही घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. आजाराला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त केला जात आहे.

गजभिये (वय 81, पुर्ण नाव समजू शकले नाही) असे आत्महत्या केलेल्या वृध्दाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाची बाधा झाल्याने गजभिये यांना 26 रोजी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. गेल्या 4 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. सोमवारी सायंकाळी रुग्णालयातील सफाई कर्मचारी बाथरुममध्ये गेला असता तिथे गजभिये यांनी ऑक्सिजन मास्कच्या वायरनेच गळफास लावल्याचे आढळून आले. कर्मचाऱ्याने तातडीने रुग्णालय प्रशासनाला याची माहिती दिली. रुग्णालय प्रशासनाने अजनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. गजभिये याला रुग्णालयात कोण दाखल केले, त्याचे नातेवाईक कोण याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. मेडिकलच्या कागदपत्रात त्यांचा पत्ता रामबाग असा दिला आहे. रामबाग हा या हॉस्पिटलला लागून असलेलाच भाग आहे. अजनी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू केला आहे.