‘शनि’वार बनला ‘घात’वार ! राज्यात 2 वेगवेगळ्या अपघातात 9 जणांचा मृत्यू

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – विदर्भामध्ये दोन वेगवेगळ्या अपघातामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. नागपूर आणि अकोला येथे आज सकाळी हे अपघात झाले आहेत. नागपूरमध्ये एका वऱ्हाडाच्या बसची धडक कंटेनरला बसली. यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला तर अकोला येथे एका टेम्पोची धडक दोन वारकऱ्यांनाबसून त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आज (शनिवार) पहाटे नगापूर – भंडारा महामार्गावर लग्नाहून परतत असताना वऱ्हाडाच्या बसने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला जोरदार धडक दिली. यामध्ये बसमधील सात जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर जवळच्या मेयो रुग्णालायात उपचार सुरु आहेत. अपघातातील सर्वजण नागपूरच्या गांधीबाग येथील पोलीस क्वॉर्टरमधील रहिवाशी असून मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिसांकडून मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.

बसने कंटेनरला जोरादार धडक दिल्याने बसच्या काचांचा चक्काचूर झाला. रस्त्यावर काचांचा खच पडला होता. अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघातामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

दोन वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू
दुसरा अपघात अकोल्यातील शेगाव येथे आज सकाळी झाला. दोन वारकरी रस्त्यावरून चालत जात असताना पाठिमागून भरधाव वेगात आलेल्या टेम्पोची धडक त्यांना बसली. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. या दोघांची अद्याप ओळख पटली नसून पोलिसांनी टेम्पो चालकावर गुन्हा दाखल करून मृत वारकऱ्यांची ओळख पटवण्याचे काम सुरु केले आहे.