ऑस्ट्रेलिया ‘बिग बॅश’ लीगवर नागपूरात सट्टेबाजी; एकाला बुकीला अटक, मुख्य सुत्रधार फरार

नागपूर : जगात कोठेही क्रिकेट अथवा फुटबॉलचे सामने सुरु असतील तर, त्याच्यावर नागपूरात सट्टेबाजी सुरु असते, असे म्हटले जाते. त्याचा प्रत्यय गुन्हे शाखेला आला आहे. ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या बिग बॅश लीगच्या क्रिकेट सामन्यावर सट्टेबाजी करणार्‍या बुकीच्या अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून एका बुकीला अटक केली आहे.

पंकज विष्णु धावराणी (वय ३४, रा. तुलसीनगर, शांतीनगर) असे या बुकीचे नाव आहे. या अड्ड्याचा सुत्रधार सुरेश चेलवानी आणि त्याचा साथीदार नवीन धर्मानी (रा़. जरीपटका) हे दोघे पळून गेले आहेत.

सध्या ऑस्ट्रेलियात बिग बॅश लीग क्रिकेट स्पर्धा सुरु आहे. या सामन्यावर कुशीनगर येथे एका ठिकाणी सट्टा चालविला जातो, अशी माहिती गुन्हे शाखेच्या युनिट ३ ला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मदन शाम अपार्टमेंटवर छापा टाकला. तेथे पंकज धावरानी हा बेटिंग घेताना आढळून आला. तेथून पोलिसांनी टीव्ही, ५ मोबाईल, बेटिंगच्या नोंदीची पाने आणि दुचाकी जप्त केली आहे. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत हा अड्डा तन्नू चेलवानी याचा असल्याचे सांगितले. तन्नू चेलवानी याच्यावर यापूर्वीही पोलिसांनी कारवाई केली आहे. तो बुकी आणि पंटरला लाईन देतो. चेलवानी आणि धर्मानी यांचा पोलीस शोध घेत आहेत.