नागपूर : ‘मला कोरोना झालाय, माझ्यामुळे इतरांना होऊ नये म्हणून आत्महत्या करतोय’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन –   नागपूरमध्ये कोरोनाचा प्रकोप वाढत असून दररोज मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत आहेत. अशातच एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. एका व्यक्तीने धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली आहे. या व्यक्तीने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे, ‘मला कोरोना झाला आहे, त्यामुळे माझे जिवंत राहणे कठीण आहे.. यात कोणालाही दोषी धरु नका’ असे म्हटले आहे. ही घटना पंचशीलनगरमधील मेहरे कॉलनीत उघडकीस आली आहे.

सुरेश महादेव नखाते (वय-50 रा. प्लॉट क्रमांक 148, सुयोगनगर) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुरेश नखाते हे बागकाम करत होते. त्यांना शनिवारी (दि.10) सर्दी व खोकला झाला होता. त्यांच्या पत्नी वर्षा नखाते यांनी सुरेश यांना कोरोना चाचणी करण्यास सांगितले होते. त्यासाठी ते घरुन निघाले. रात्र झाली तरी ते घरी परतले नाहीत. त्यामुळे वर्षा नखाते यांनी सुरेश हे बेपत्ता झाल्याची तक्रार अजनी पोलिसांना दिली.

सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास मेहरे कॉलनीतील रेल्वेरुळाजवळ एका व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती सोनेगाव पोलिसांना मिळाली. घटनेची माहिती मिळताच सोनेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मृतदेहाची तपासणी केली असता मृत व्यक्तीच्या खिशात चिठ्ठी सापडली. आजारपणाला कंटाळून आत्महत्या करीत असून आत्महत्येसाठी कोणीही जबाबदार नाही, असे या चिठ्ठीत नमूद करण्यात आले आहे.

पोलिसांनी वर्षा नखाते यांना माहिती देऊन मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी बोलावून घेतले. वर्षा यांनी मृतदेह सुरेश यांचा असल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी मृतदेह मेडिकल हॉस्पिटलमध्ये पाठवला. मृतदेहाची तपासणी केली असता सुरेश नखाते यांना कोरना असल्याचे आढळून आले. सुरेश यांनी विष घेतल्यानंतर रेल्वे ट्रॅकवर पोहचल्याची शक्यता आहे. याप्रकरणी पोलिसांनी सोनेगाव पोलिसांनी अकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.