Coronaviurs : तुकाराम मुंढे यांनी उचललं कठोर पाऊल, 1200 जणांना करणार क्वारंटाईन

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना विषाणूचा हॉटस्पॉट ठरलेल्या शहरातील सतरंजीपुरा परिसराबाबत आता महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांनी कठोर पाऊल उचललं आहे. सतरंजीपुरा भागातील नागरिक अद्यापही माहिती लपवत असल्याचे समोर आल्याने या परिसरातील बहुतांश नागरिकांना विलगीकरण कक्षात हरवण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. हे काम मंगळवारी (दि.28) सकाळपर्यंत पूर्ण होणार आहे.

सोमवारी रात्री बारा पर्यंत सतरंजीपुऱ्यातील 450 आतापर्य़ंत विलगिकरण कक्षात रवानगी करण्यात आली आहे. ही प्रक्रिया रात्रभर सुरु राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मंगळवारी सकाळपर्यंत विलगीकरण करण्यात येणाऱ्या नागरिकांचा आकडा अंदाजे 1200 च्या घरात पोहचेल अशी माहिती नागपूर महापालिका आयुक्त तुकारम मुंडे यांनी दिली.

सतरंजीपुरा परिसर नागपूरसाठी कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. त्यामुळे नागपूर महानगरपालिकेचे पथक दररोज या परिसरात सर्व्हेक्षण करत आहे. नागरिकांना त्यांची इत्यंभूत माहिती विचारत आहेत. परंतु अद्यापही नागरिक संपूर्ण माहिती देत नसल्याची बाब सर्व्हेक्षणातून समोर आली आहे. कोरोनामुळे मृत पावलेल्या नागरिकांच्या संपर्कात सुमारे 200 च्या वर नागरिकांनीही अशीच माहिती लपवली होती.

त्यांना वेळीच विलगीकरण कक्षात पाठवल्याने मोठा संसर्ग टळला. त्यातीलच अनेक पॉझिटिव्ह असलेल्यांचा आकडा 80 पर्यंत पोहचला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी खरी माहिती लपवली तर तेथून अनेक नागरिक पॉझिटिव्ह निघू शकतात. येथील नागरिकांना तातडीने विलगीकरण कक्षात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी सांगितले.