नागपूरमध्ये पुन्हा एका पतसंस्थेत घोटाळा, FIR दाखल

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – नागपूरमध्ये आणखी एका पतसंस्थेतील घोटाळा उघडकीस आला असून याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात बापलेकांसह दहा पदाधिकाऱ्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांनी 70 लाखांच्या गुंतवणुकीवर महिन्याला 60 हजार रुपये व्याज देतो अशी थाप मारून पदाधिकाऱ्यांनी लाखोंची रक्कम हडपली. महालमधील एका पतसंस्थेत हा घोटाळा उघडकीस आला आहे.

आरोपी रमेश बाबुराव पुंड, मनीष रमेश पुंड, पंकज रमेश पुंड (तिघे रा. महाल किल्ला मातामंदिराजवळ) यांनी जागती जनसेवा अर्बन क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सहकारी सोसायटी सुरु केली होती. आरोपी रमेश पुंड आणि फिर्यादी राजेश उर्फ राजू नगरधने (वय-48 रा. गजानन मंदिराजवळ, महाल नागपूर) यांची मैत्री होती. नगरधने यांनी 2014-15 मध्ये त्यांची वडिलोपार्जित शेती विकली होती. या व्यवहारातून त्यांना मोठी रक्कम मिळाली होती. याचाच फायदा घेत रमेश पुंड आणि त्यांच्या दोन मुलांनी फिर्यादी नगरधने यांना 70 लाख रुपये गुंतवणूक केल्यास महिन्याला 60 ते 70 हजार रुपये व्याज देण्याचे अमिष दाखवले.

फिर्य़ादी यांनी पैसे गुंतवल्यानंतर काही दिवस व्याज दिले. मात्र, त्यानंतर व्याज देणे बंद केले. त्यामुळे नगरधने यांनी 1 फेब्रुवारी 2015 रोजी मुदत संपलेल्या ठेवीची रक्कम 7 लाख 28 हजार रुपये आणि व्याज मागितले. मात्र, आरोपींनी रक्कम आणि व्याज देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे त्यांनी सोसायटीचे संचालक मोरेश्वर रामभाऊ खडसकर, शंकरराव रामनाथजी पुंड, किशोर पैनिकर, कुंदा नगरधने, विजय नगरधने, वसीम हमीदखान आणि किरण मोहाडीकर यांच्याकडे दाद मागून पैशाची मागणी केली.

आपण शेती विकून सर्व रक्कम तुमच्याकडे दिली. घर बांधण्यासाठी बँकेचे कर्ज घेतले. बँक आपल्याला नोटीस देत आहे. आजारपणामुळे आणि इतर कामासाठी रकमेची आवश्यकता आहे, असे सांगून नगरधने यांनी पैशांची मागणी केली. मात्र आरोपींनी राजेश नगरधने यांना रक्कम परत केली नाही. अखेर रविवारी त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. यामुळे ठेवीदारांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.

Visit : Policenama.com 

You might also like