धक्कादायक ! ‘पॅरोल’वर जेलमधून बाहेर आला अन् पोलिस अधिकार्‍याच्या पत्नीला संपवलं

मुंबई :  पोलीसनामा ऑनलाईन  –  नागपूर जिल्ह्यातील गाडगेनगर भागात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. येथे पॅरोलवर नुकताच कारागृहातून सुटलेल्या एका कुख्यात गुंडाने पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीचा चाकूने गळा चिरून निर्घृण हत्या केली आहे. एवढेच नव्हे तर मुलालादेखील ठार मारण्याचा प्रयत्न केला. शनिवारी सकाळी १०च्या सुमारास ही घटना घडल्याचे समजते. सुशिला अशोक मुळे ( वय ५२) असे मृत महिलेचे नाव असून मुलगा नवीन (वय ३० दोन्ही रा. गाडगेनगर) हा जखमी झाला आहे. या प्रकरणी आरोपी नवीन सुरेश गोटाफोडे याच्याविरुद्ध नंदनवन पोलिसांनी हत्या व हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अशोक यांचा मुलगा नवीन हा गोटाफोडे याचा बालपणीचा मित्र आहे. शनिवारी सकाळी गोटाफोडे हा त्यांच्या घरी गेला आणि नवीनबाबत विचारणा केली. यावेळी अशोक यांच्या पत्नी सुशीला यांनी नवीन हा घरी नसल्याचे सांगितले आणि स्वयंपाक घरात निघून गेल्या. त्यामुळे संतापलेल्या गोटाफोडेने स्वयंपाक घरात घुसत चाकू उचलून सुशिला यांचा गळा चिरला. त्या आवाजाने नवीन हा मदतीसाठी धावला असता गोटाफोडेने त्याच्या शरीरावरही चाकूने सपासप वार केले आणि घटनास्थळावरून पसार झाला. त्यांनतर आरडाओरड झाल्याने शेजाऱ्यांनी धाव घेतली आणि जखमींना तातडीने मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल केले. दरम्यान, सुशिला यांचा मृत्यू झाला होता. नवीन याच्या तक्रारीवरून पोलिसांनी गोटाफोडे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू केला आहे.

दरम्यान, आरोपी गोटाफोडे याने डिसेंबर २०१७ मध्ये एका तरुणाची हत्या केली होती. तसेच एका चोरी प्रकरणात तो कारागृहात होता. सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सरकारने नागपुरातील काही गुंडांची पॅरोलवर सुटका केली. ज्यात गोटाफोडेचाही समावेश होता. चार दिवसांपूर्वी तो कारागृहातून बाहेर आल्याचे समजते.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like