नागपूर : कोट्यवधींची जमीन हडपल्याप्रकरणी सफेलकर टोळीवर FIR

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – शेतमालक अन् त्याच्या मुलाचे अपहरण करून जीवे मारण्याची धमकी देत कोट्यवधींची जमीन हडपल्याप्रकरणी गँगस्टर रंजीत सफेलकर आणि त्याच्या टोळीवर गुन्हे शाखेने शुक्रवारी (दि.14) पुन्हा एक गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे या टोळीच्या दहशतीत असलेल्या अनेक पीडितांना दिलासा मिळाला आहे.

संजय आनंदराव धापोडकर, गुड्डू ऊर्फ भास्कर पांडुरंग धापोडकर, राकेश हरिशंकर गुप्ता, नीलेश हेमंत ठाकरे आणि कालू नारायण हाटे असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्र ऊर्फ रवी नथुजी घोडे (वय 50) हे कामठीजवळच्या अजनी बुद्रुक येथे राहतात. त्यांची मौजे घोरपड येथे शेती आहे. 15 जून 2008 पासून गँगस्टर रंजीत सफेलकर, संजय धापोडकर आणि त्यांच्या साथीदारांनी या शेतीकडे नजर वळवली. शेती बळकावण्यासाठी विविध प्रकारचे कटकारस्थान रचले. आरोपीनी फिर्यादी आणि त्यांच्या मुलाचे अपहरण केले. त्यांना ठार मारण्याची धमकी देत त्यांच्या शेतीवर कब्जा मिळवला. त्यानंतर त्यातील 91 लाखांच्या प्लाटची परस्पर विक्री केली. याबाबत कुठे काही बोलला तर जीवे ठार मारू, अशी धमकीही दिली होती. जीवाच्या भीतीमुळे घोडे गप्प होते. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिलेल्या आदेशानंतर गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन राजमाने यांनी गँगस्टर सफेलकर आणि त्याच्या टोळीवर कारवाई केली आहे.