‘कोरोना’मुळं एकाच दिवसात 4 पोलिसांचा मृत्यू, नागपूर हादरलं !

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – पोलीस दलात कोरोनाचा कहर वाढत आहे. अशातच शनिवारी 4 पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. एका दिवसात 4 पोलीस कर्मचारी दगावल्यानं आता पोलिसांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. या घटनेनंतर नागपूर शहर हादरलं आहे. मृत पोलीस कर्माचाऱ्यांमध्ये नागपूर ग्रामीण पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा समावेश आहे. नागपूरात आतापर्यंत कोरोनामुळं 10 पोलिसांनी आपला जीव गमावला आहे.

नागपूर शहरातील सिक्करदार पोलीस स्टेशनमधील पोलीस शिपाई प्रवीण साहेबराव सूरकर (वय 43, रा जंबुदीपनगर) यांची 1 सप्टेंबर रोजी प्रकृती खालावली. त्यांना तातडीनं खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथंच उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी शीतल, मुलगा रोहित, मुलगी शानवी आहे. आहे. पोलीस मुख्यालयातील महिला हेडकॉन्स्टेबल वत्सला राजू मसराम (वय 54 रा राजीवनगर पांढराबोडी) यांची 31 ऑगस्ट रोजी प्रकृती खालावली. त्यांना मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मागे पती, मुलगी दीपाली आहे.

गणेशपेठ पोलीस स्टेशनमधील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश पंढरीनाथ मडावी (वय 52, रा नवीन क्वाटर्स, झिंगाबाई टाकळी) यांची 2 सप्टेंबर रोजी प्रकृती खालवली होती. त्याचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या मागे पत्नी मैना, मुलगा प्रतीक, दोन मुली मोनाली व मिताली आहेत. तसेच नागपूर ग्रामीण पोलीस दलातील पोलीस नियंत्रण कक्षात कार्यरत सुनील बाबूराव सेलुकर यांचाही वानाडोंगरीतील शालिनीताई मेघे हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला.