चिंताजनक ! नागपूरमध्ये रूग्णालयातून 4 ‘कोरोना’ग्रस्तांचं पलायन

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या संसर्गाची धास्ती नागरिकांमध्ये पसरली आहे. त्यामुळे उपचारांसाठी दाखल होणार्‍यांमध्येही भीतीचे वातावरण आहे. अफवा आणि भीतीमुळे नागपूरमधील मेयो रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेले कोरोनाचे चार संशयित रूग्णांनी पलायन केले आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्येही कोरोना विषाणूने शिरकाव केला आहे. काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या संशयित रूग्णांना मयो रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी चार रुग्णांनी हॉस्पिटलमधून पलायन केल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोरोनाच्या संशयित रूग्णांना मयो रूग्णालयातील स्वतंत्र वॉर्डमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र, शनिवारी या ठिकाणी कोरोनाचा रुग्ण असल्याची अफवा सकाळच्या सुमारास वॉर्डमध्ये पसरली. त्यानंतर या वॉर्डमध्ये दाखल असेल्या चार संशयित रूग्णांनी पलायन केले आहे. त्यामध्ये यापैकी एक रूग्ण चंद्रपुरातील तर तीन रूग्ण नागपुरातील आहेत.

दरम्यान, काही वेळाने रूग्णालयाच्या प्रशासनाच्या ही बाब ध्यानात आली. त्यानंतर एकच खळबळ उडाली होती. यानंतर रूग्णालयाने पोलिसांशी संपर्क साधून या घटनेबाबत माहिती दिली. रूग्णांच्या नातेवाईकांशीही संपर्क साधण्यात आला आहे.