आयुक्त तुकाराम मुंढेंचा डॉक्टरांना इशारा, म्हणाले – ‘काम जमत नसेल तर घरी जा’

पोलीसनामा ऑनलाइन – काम जमत नसेल तर घरी जा असा इशारा नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी डॉक्टरांना दिला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुकाराम मुंढे यांनी अधिकारी आणि कर्मचारी यांची शाळा घेतली. नागपूर महानगरपालिकेचे अवस्था पाहून त्यांना संताप आल्याने त्यांनी या ठिकाणच्या कर्मचार्‍यांना सक्त ताकीद दिली.

https://twitter.com/Tukaram_IndIAS/status/1243882282978611205

नागपूर महानगरपालिकेचे सर्वात चांगले असणारे रूग्णालय आज उकिरड्यासारखे झाले आहे. असे प्रकार कदापी खपवून घेतले जाणार नाही, असे म्हणत मुंढे यांनी सर्वांना सक्त ताकीद दिली. महानगपालिकेचे डॉक्टर्स योग्यरित्या आपली प्रॅक्टिस करत नाही. ज्यांना काम जमत नसेल त्यांनी घरी जावे असा दम त्यांनी तेथील डॉक्टरांसह कर्मचार्‍यांना दिला.कोरोनाविरूद्ध लढण्यासाठी आरोग्य विभागाने सज्ज राहावे, असे आदेश त्यांनी यावेळी दिले. तसेच प्रशासनातली गोपनीय माहिती बाहेर पडत असल्याबाबत त्यांनी नाराजीही व्यक्त केली.

यापूर्वीही काही दिवसांपूर्वी तुकाराम मुंढे यांनी माध्यमांशी संवाद साधताना नागरिकांनी लॉकडाउनच्या निर्णयाचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले होतं. या ठिकाणी करोनाग्रस्तांची वाढती संख्या चिंताजनक आहे. लॉकडाउनचं पालन योग्यरित्या होत नसल्यानं प्रशासनाच्या प्रयत्नांना यश मिळत नाही. नागरिकांनी लॉकडाउनच्या निर्णयाचे पालन न केल्यास गंभीर परिस्थितीला सामोरे जावेे लागेल. असा इशाराही त्यांनी दिला होता. याव्यतिरिक्त लॉकडाउन दरम्यान जीवनावश्यक वस्तू घरपोच देण्यासाठी पालिकेनं सुविधाही सुरू केली आहे.