अंत्यसंस्कारापूर्वी ‘कोरोना’बाधित मृतदेहाचा चेहरा उघडताच कुटुंबाला बसला धक्का, प्रशासनाचा भोंगळ कारभार उघड

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत असताना मृतांची संख्या देखील वाढत आहे. अशातच पालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ होत असल्याचे अनेक धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार नागपूरमध्ये समोर आला आहे. उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या पुरुष मृतदेहाच्या जागी महिलेचा मृतदेह दिल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गांगाबाई घाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करताना हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पालिकेच्या या हलगर्जीपणामुळे कुटुंबियांच्या भावना दुखावल्या आहेत. नागपूरच्या लता मंगेशकर रुग्णालयाचा भोंगळ कारभार समोर आला आहे. अंत्यसंस्काराच्यावेळी ही बाब लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. आपले माणूस गेल्याच्या दु:खात असलेल्या नातेवाईकंना नाहक मनस्तापाला सामोरे जावे लागले. या प्रकरणात महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची चूक असल्याचे हॉस्पिटलचे म्हणणे आहे.

लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये एका कोरोना बाधित पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांकडे सोपवण्यात आला. स्मशानभूमीत अंत्यसंस्काराच्या वेळी चेहरा उघडण्यात आला. चेहरा उघडताच कुटुंबाला धक्का बसला. कारण पुरुषाच्या मृतदेहाऐवजी महिलेचा मृतदेह असल्याने या ठिकाणी उपस्थितांमध्ये एकच खळबळ उडाली. पालिकेने महिलेच्या मृतदेहावर पुरुषाच्या नावाचा टॅग लावला होता. त्यामुळे कुटुंबियांचा मनस्ताप झाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु करण्यात आला आहे.