नागपुरात टोळीयुद्ध : जुन्या वैमनस्यातून कुख्यात गुंडाची हत्या

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – येथील कुख्यात गुंड पिंटू दिनू ठवकर (३५) याची निघृर्ण हत्या करण्यात आली. ही घटना पाचपावली पोलीसठाण्यांतर्गत येणाऱ्या राऊत चौकात घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. प्रतिस्पर्धी टोळीतील गुंडांनी हे कृत्य केल्याचा पोलिसांना संशय आहे. पिंटू ठवकर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्न, दंगा भडकावणे, अपहरण, खंडणी वसुली, पोलिसांवर हल्ले करणे यांसारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल होते.

मृत गुंडावर दोन वेळा तडीपारीची, स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली होती, मात्र, तो राजरोसपणे पाचपावली परिसरातील दुकानदार तसेच नागरिकांकडून खंडणी गोळा करीत होता. त्यामुळे त्याची पाचपावलीत दहशत होती. कारागृहातून बाहेर आल्यानंतर त्याने पाचपावलीत जुगार अड्डा तसेच क्लब सुरू केला होता. त्याठिकाणी त्याच्या विश्वासातील व्यक्ती काम करायचा. त्याने परिसरातील प्रतिस्पर्धी गुंडांसोबत हातमिळवणी केल्यानंतर पिंटूचा गेल्या काही दिवसांपासून त्या गुंडासोबत वाद सुरू होता. एके दिवशी दोघांमध्ये आमनासामना झाल्यानंतर त्यांच्यात हाणामारी झाली होती आणि त्यांनी एकमेकांना पाहून घेण्याचीही धमकी दिली होती.

पिंटूची वाढती दहशत पाहून प्रतिस्पर्धी टोळीतील गुंडांनी त्याचा गेम करण्याचा कट रचला होता. काही दिवसांपासून ते संधीच्या शोधात होते. पिंटू कोर्टातून तारीख घेऊन आपल्या अड्ड्याकडे जाण्यासाठी निघाला असल्याचे कळताच प्रतिस्पर्धी गुंडांनी त्याला राऊत चौकाजवळील नाईक तलावाजवळ अडविले. यावेळी त्यांनी त्याला घेरले आणि चाकू, तलवारीने वार करून रक्ताच्या थारोळ्यात लोळविले. पिंटू मृत झाल्याचे लक्षात आल्यानंतर आरोपी पळून गेले. भरदिवसा वर्दळीच्या भागात घडलेल्या घटनेची माहिती मिळताच परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर, साहाय्यक आयुक्त वालचंद मुंडे यांच्यासह पाचपावली तसेच गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी सीताराम शाहू, गोलू चांदरी, मनीष सबानी, सागर भांजा यांसह साथीदारांना अटक केली आहे.