हेमंत करकरेंची हत्या महाराष्ट्र पोलिसांच्या पिस्तुलाने झाली, माजी न्यायाधीश बी.जी. कोळसे-पाटील यांचा आरोप

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – ‘अलायन्स अगेंस्ट सीएए, एनआरसी अ‍ॅंण्ड एनपीआर’ (Alliance Against CAA, NRC and NPR) चे अध्यक्ष आणि सेवानिवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील यांनी हेमंत करकरे यांच्या हत्येबाबत धक्कादायक आरोप करुन नवा वाद उकरुन काढला आहे. सेवानिवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील यांनी आरोप केला आहे की मुंबईवर 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले तत्कालीन एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांची हत्या अजमल कसाबने नाही तर महाराष्ट्र पोलिसांच्या पिस्तुलाने झाली आहे.

16 फेब्रुवारीला नागपूरच्या जाफरनगर भागात अलायन्स अगेंस्ट सीएए, एनआरसी अ‍ॅंण्ड एनपीआरच्या वतीने संविधान बचाओ सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला संबोधित करताना कार्यक्रमात अध्यक्षस्थानी असलेले बी. जी. कोळसे यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्ये करुन खळबळ उडवून दिली आहे.

यावेळी बी. जी. कोळसे पाटील म्हणाले की हेमंत करकरे यांची हत्या अजमल कसाब किंवा इतर कोणत्याही पाकिस्तानी दहशतवाद्याच्या गोळ्यांनी झाली नाही. तर हेमंत करकरे यांना महाराष्ट्र पोलिसांच्या ‘पॉईंट नाईन’ या पिस्तूलने पाठीमागून गोळ्या घालून ठार करण्यात आले होते. हे कृत्य मुंबई पोलीस दलातील कोणी हिंदुत्ववादी किंवा मनुवाद्याने केले असावे असा खळबळजनक दावा कोळसे पाटील यांनी केला आहे.

कर्नल पुरोहितने सुरुवातीला मोहन भागवत यांच्या इशाऱ्यावर काम केले. त्यानंतर तोच कर्नल पुरोहित मोहन भागवत यांच्या हत्येचा कट रचत होता, त्याने तशी सुपारी काही शार्प शूटर्सला दिली होती असा धक्कादायक आरोप देखील कोळसे पाटील यांनी केला.

देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी…
वाजपेयी प्रत्येक परदेश दौऱ्यावर महिलांना सोबत न्यायचे असे त्यांचे हिंदुत्व होते. तसेच अटलबिहारी यांनी बाबरी मशिदीबद्दल सर्वोच्च न्यायालयाला दगा दिला होता असा खळबळजनक दावा कोळसे पाटील यांनी केला.