Nagpur News : पती-पत्नीचा वाद ! जन्मदात्या पित्याकडून २ वर्षाच्या मुलीची ब्लेडने गळा चिरुन हत्या, स्वतः केली आत्महत्या

नागपूर : पती पत्नीच्या वादातून जन्मदात्या पित्याने आपल्याच २ वर्षाच्या मुलींचा ब्लेडने गळा चिरुन हत्या केली. त्यानंतर स्वत: आत्महत्येचा प्रयत्न केला. बुटीबोरी परिसरातील गणेशपूर येथे सोमवारी सायंकाळी ही धक्कादायक घटना घडली.
राधिका किशोर सयाम (वय २) असे मृत पावलेल्या मुलीचे नाव आहे. पिता किशोर सयाम (वय ४०) याच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.

किशोर आणि त्याची पत्नी पूूजा (वय ३०) आणि दोन वर्षाची मुलगी राधिकासह ते गणेशपूर येथे दास यांच्याकडे भाड्याने रहात होते. ते मुळचे चंद्रपूर जिल्ह्यातील शिंदेशाही तालुक्यातील उमरवाही येथील राहणारे आहेत. गेल्या काही दिवसांपासून किशोर हा पूजाच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला होता. दारु पिऊन येऊन तो तिला मारहाण करायचा. तिच्याकडे घटस्फोटाची मागणी करायचा. सोमवारी सकाळीच तो दारु पिऊन आला व पूजाला शिवीगाळ करत मारहाण करु लागला. त्यातून त्यांच्यात भांडणे झाली. या रोजच्या त्रासाला कंटाळून पूजा पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी गेली. तेव्हा किशोर व त्यांची मुलगी राधिका हे घरीच होते. पूजाने एमआयडीसी पोलीस ठाण्यात गेली. तक्रार केल्यावर तिच्याबरोबर पोलीस घरी आले. तेव्हा राधिका रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. किशोरही जखमी अवस्थेत होता. पोलिसांनी दोघांना तात्काळ रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी राधिका हिला मृत घोषित केले. किशोरला अधिक उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात आणण्यात आले आहे. एमआयडीसी पोलीस अधिक तपास करीत आहेत.