नितीन गडकरी यांच्यावर नागपुरात ‘अँजिओप्लास्टी’, PM मोदींनी फोन करून केली प्रकृतीची चौकशी

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हृदयावर चार दिवसांपूर्वी नागपूरमध्ये अँजिओप्लास्टी करण्यात आली. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिनीमध्ये गुठळ्या आढळल्याने स्टेंट (एक प्रकारची जाळी) बसवण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. हर्षवर्धन मार्डीकर यांनी त्यांच्यावर उपचार केले. आता त्यांची प्रकृती उत्तम असून त्यांनी दैनंदिन कामकाजाला सुरुवात केल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह अन्य नेत्यांनी गडकरी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. तसेच लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छाही व्यक्त केल्या. रुग्णालयातून घरी परतल्यावर गडकरी यांनी निवासस्थानातूनच दैनंदिन कामकाजास सुरुवात केली. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मंत्रालयातील अधिकाऱ्यांशी ते संवाद साधत आहे. हृदयाकडे रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिनीमध्ये जर कोणत्याही प्रकारचे अडथळे निर्माण झाले तर तो अडथळा दूर करण्यासाठी अँजिओप्लास्टी केली जाते. याची पूर्व तपासणी अँजिओग्राफीद्वारे केली जाते.