1,00,000 लाच घेताना पोलीस अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – प्लॉटवरील अतिक्रमण काढून देण्यासाठी एक लाख रुपयाची लाच घेणाऱ्या अजनी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी (दि.8) रंगेहाथ पकडले. ही कारवाई शताब्दी चौकात करण्यात आली. या कारवाईमुळे अजनी पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. राजेशसिंग केशविसंग ठाकूर (वय-56 रा. शांतीनगर) असे अटक करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.

तक्रारदार हा रेल्वेत पार्सल कंत्राटदार आहे. त्याचा बोरकरनगर भागात प्लॉट आहे. या प्लॉटवर भांगारविक्रेता गोपालसिंग याने अतिक्रमण केले आहे. यावरून तक्रारदार व गोपालसिंग या दोघांमध्ये वाद सुरु होते. गोपालसिंग याच्या तक्रारीवरून अजनी पोलीस ठाण्यात तक्रारदाराविरुद्धच बेकायदा जमाव एकत्र आण्यासह विविध कललमान्वये गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाचा तपास ठाकूर यांच्याकडे आहे. या प्रकरणात ठाकूर यांनी तक्रारदार यांना अटक केली होती. प्लॉट रिकामा करून देण्यासाठी ठाकूर यांनी तक्रारदार यांच्याकेडे तीन लाखाची लाच मागितली. एवढी रक्कम देण्यास तक्रारदार यांनी असमर्थता दर्शवल्यानंतर ठाकूर यांनी 1 लाख रुपये दे असे तक्रारदाराला म्हणाले.

तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली. पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, अतिरिक्त अधीक्षक राजेश दुद्धुलवार, उपअधीक्षक मिलिंद तोतरे यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महिला पोलीस निरीक्षक योगिता चाफले, मोनाली चौधरी, पोलीस शिपाई रविकांत डहाट, मंगेश कळंबे, लक्ष्मण परतेती, अस्मिता मेश्राम, वकील शेख यांनी सापळा रचला. लाच घेताना पथकाने ठाकूर यांना अटक केली. ठाकूर यांच्या विरुद्ध अजनी पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या घराची देखील झडती घेण्यात येत आहे.