खळबळजनक ! नागपूरमध्ये पोलिसाच्याच मुलाचे अपहरण

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – नागपूर शहरात गुन्हेगारांनी उच्छाद मांडला आहे. गुन्हेगारांनी पोलीस (police) कर्मचाऱ्याच्या मुलाचे अपहरण (kidnapped) केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या घटनेमुळे नागपूर (nagpur) पोलीस दलात खळबळ उडाली आहे. मात्र, अपहरण झालेल्या 12 वर्षाच्या मुलाने अपहरणकर्त्यांच्या तावडीतून मोठ्या शिताफीने सुटका करवून घेतली. मुलगा सुखरुप घरी पोहोचल्याने त्याचे पालक व पोलीस विभागाचा जीव भांड्यात पडला.

ही घटना शुक्रवारी दुपारी 1.20 ते संध्याकाळी 6.30 दरम्यान घडली. पल्लवी कमलेश जावडीकर (वय-31) यांचे पती कमलेश वाडी पोलीस ठाण्यात पोलीस नाईक म्हणून कार्यरत आहेत. ते आपल्या कुटुंबासह गिट्टीखदान पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या पोलीस लाईन टाकळी येथील पोलीस वसाहतीत वास्तव्यास आहेत. त्यांचा मुलगा सार्थक शुक्रवारी दुपारी सव्वा एकच्या सुमारास घरासमोर खेळत होता. यावेळी चार अनोळखी व्यक्ती त्याला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तेथे आले. त्यांनी सर्थकला मारुती व्हॅनमध्ये बसविले व पळवून नेले.

काही वेळाने कमलेश यांना फोन आला. तुमचा मुलगा आमच्याकडे आहे, त्याच्या सुटकेसाठी 10 लाख रुपये तयार ठेवा, अशी धमकी दिली. घटनेची माहिती मिळताच गिट्टीखदान पोलिसांनी तातडीने सूत्रे हलविली. मात्र, सार्थकची काहीच माहिती मिळाली नाही. अपहरणकर्ते मुलाला घेऊन शहरात फिरत असावेत, असा पोलिसांचा अंदाज होता.

चहासाठी थांबले अन्
अपहरणकर्ते गणेशपेठ परिसरात चहा पिण्यासाठी थांबले. या संधीचा फायदा घेत सार्थकने गाडीतून पळ काढला. तो तलाव परिसरात राहणाऱ्या त्याच्या मावशीकडे पोहोचला. मावशीने त्याच्या पालकांना फोन करुन ही माहिती दिली. अखेर सार्थक सुखरुप घरी पोहोचला. अपहरणकर्त्यांनी मास्क बांधलेले असल्याने त्यांची ओळख पटविणे अवघड आहे. अद्याप चारही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.

You might also like