Nagpur Politics | नागपूरात शिनसेनेच्या दोन्ही गटांमध्ये रंगली कार्यकर्ते पळविण्याची स्पर्धा; कोण कोणत्या गटाचा यामध्ये संभ्रम

नागपूर : पोलीसनामा ऑनलाईन – Nagpur Politics | नागपूर येथे ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यामध्ये कार्यकर्ते पळविण्याची स्पर्धा लागली असून यात कोण कोणत्या गटाचा यामुळे प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे. यातच नागपूर येथील शिवसेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा दोन्ही गटाच्या कार्यकारिणीच्या यादीत समावेश नसल्याने चांगलाच गोंधळ उडाला. काल शिंदे गटाकडून कामठीचे संघटक म्हणून विठ्ठल जुमडे (Vitthal Jumde) यांची नियुक्ती केली. त्यानंतर जुमडे यांनी आपण शिवसेनेचा ठाकरे गट सोडला नसून आपण ठाकरे गटाचा नागपूर ग्रामीणचा तालुका प्रमुख असल्याचे सांगितले. तर दुसरीकडे शिंदे गटाकडून उमरेड तालुका प्रमुख म्हणुन नेमलेले चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आपण उद्धव ठाकरे गटात असून शिंदे गटात जाणार नसल्याचे पत्र दिले आहे. (Nagpur Politics)

शिवसेना पक्षात झालेल्या फुटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मोठा आमदार-खासदारांचा गट घेऊन बाहेर पडले. त्यात रामटेकचे खासदार कृपाल तुमाने (MP Krupal Tumane) आणि रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल (Ashish Jaiswal) यांचा समावेश आहे. नुकतच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधत शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख संदिप इटकेलवार (Sandip Itkelwar) यांनी विठ्ठल जुमडे यांच्याकडे कामठी विधानसभा मतदारसंघाचे संघटक म्हणुन जबाबदारी सोपविली. त्यावर शिंदे गटाच्या कार्यकारिणीत आपले नाव पाहून त्यांना धक्का बसल्याचे त्यांने सांगितले.

यावर विठ्ठल जुमडे यांनी एक प्रसिध्दीपत्रक काढून आपण ठाकरे गट सोडला नसल्याचे सांगितले.
आपण गेल्या १५ वर्षांपासून शिवसेनेसोबत आहोत. नागपूर ग्रामीणचा तालुकाप्रमुख म्हणुन पक्षाने आपली
नियुक्ती केली. आणि आजही आपण याच पदावर कार्यरत आहोत. शिंदे गटात प्रवेश केला नसला तरी आपले
नाव कार्यकारिणीत टाकले गेले आहे. याबाबत विचारणा देखील केली गेली नसल्याचे यावेळी जुमडे आणि
बावनकुळे आणि ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख देवेंद्र गोडबोले (Devendra Godbole) यांना लिहिलेल्या
पत्रात सांगितले आहे. (Nagpur Politics)

शिवसेनेच्या ठाकरे गटाने आपली नागपूर जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर करताना यावेळी एका नव्या पदाची
निर्मिती केली आहे. यावेळी ठाकरे गटाकडून कोणीही कार्यकर्ता नाराज होणार नाही याची काळजी घेतली गेली.
रामटेकचे माजी खासदार तसेच माजी जिल्हाप्रमुख प्रकाश जाधव (Prakash Jadhav) यांना नागपूर आणि
रामटेक लोकसभा मतदार संघाचे सल्लागार म्हणून नेमण्यात आले आहे. हे पद यापूर्वी अस्तित्वात नव्हते.
मात्र यात सल्लागाराला अधिकार कोणते हे स्पष्ट करण्यात आले नाही.
त्यामुळे प्रकाश जाधव हे पद स्विकारण्यास उत्सुक नसल्याची माहिती आहे.

Web Title :- Nagpur Politics | maharashtra both uddhav thackeray group and eknath shinde group have taken two same activists in nagpur