नागपूर : मोठ्या व्यापार्‍याकडं मागितली 50 कोटींची खंडणी, माजी लेखापालचा पर्दाफाश होताच झाली अटक

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – येथील संत्रानगरीतील एका बड्या व्यावसायिकाला माजी लेखापालानेच 50 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला. या घटनेने व्यापार्‍यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. ए. के. गांधी असे संबंधित व्यापार्‍याचे नाव असून, अशोक कुमार रतनलाल (71, रामदास पेठ अपार्टमेंट) यांनी यासंदर्भात पोलिसांत फिर्याद दिली आहे. तपासादरम्यान व्यापारी गांधी यांचा माजी लेखापालच आरोपी असल्याचे उघड झाले. आशिष आदेश गोडबोले (29, रा. वैष्णोदेवीनगर, स्वामी नारायण मंदिरामागे, वाठोडा) असे आरोपीचे नाव असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

आरोपी आशिष हा दीड वर्षापूर्वी गांधी यांच्या दुचाकी शोरुममध्ये लेखापाल म्हणून काम पाहत होता. वरिष्ठांबरोबर सतत वाद होत असल्याने त्याने नोकरी सोडून दिली. त्यानंतर तो नोकरीच्या शोधात होता; मात्र त्यात तो अयशस्वी झाला. ए. के. गांधी यांच्यामुळेच आपल्यावर ही वेळी आल्याने त्यांना जबाबदार धरत होता. लेखापाल असल्याने गांधी परिवाराची सर्व माहिती असल्याने त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्याविरोधात कट रचला. तो गांधी परिवाराला सतत शिवीगाळ, अश्लील मॅसेज पाठवत होता. अशातच त्याने एकेदिवशी 50 कोटींची मागणी केली आणि पैसे नाही दिले तर ठार मारण्याची धमकीही देत होता.