Lockdown : ‘लॉकडाऊन’मध्ये भावाच्या ‘मेडिकल’मधून ‘बियर’ची विक्री, बारमालक अन् मेडिकलवाला दोघेही गेले 12 च्या भावात

नागपूर : लॉकडाऊन असताना बारमधील सील केलेल्या दारुच्या बाटल्या, बीयर बाटल्या भावाच्या मेडिकल दुकानातून विकणे दोघांनाही चांगलेच महागात पडले आहे. पोलिसांनी एका भावाला अटक केली तर, दुसर्‍याचा परवाना कायमस्वरुपी रद्द केला गेला आहे. लॉकडाऊनच्या काळात मद्य विक्रीला पूर्णपणे बंदी असतानाही सरकारी सील तोडून मोठ्या प्रमाणावर मद्य विक्री करणार्‍या मदिरा बार अँड रेस्टॉरंटच्या मालकावर गुन्हा दाखल करुन जिल्हाधिकार्‍यांनी बारचा परवाना कायमस्वरुपी रद्द केला आहे. या कारवाईच्या दणक्याने लपून छपून दारु विक्री करणार्‍या बारवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.

सरकारच्या आदेशाप्रमाणे राज्य उत्पादन शुक्ल विभागाने ठिकठिकाणच्या बार आणि वाईन शॉपला सील लावले आहे. नागपूरातील दोसर भवन चौकात असलेल्या मदिरा बार अँड रेस्टोरेंटला 24 मार्चला सील लावण्यात आले होते. या बारमधील वेगवेगळ्या प्रकारच्या मद्याच्या बाटल्या आणि बिअरचा साठा मोजून संबंधित बार मालकाकडून त्याची रजिस्टरवर नोंद करुन घेण्यात आली होती.

या बारच्या बाजूला बारमालक नीरज गुप्ता याच्या भावाचे कांचन मेडिकल स्टोअर्स हे दुकान आहे. या दुकानात बीयरची बाटली १० पट जास्त भावाने विक्री केली जात असल्याची माहिती गणेश पेठ पोलिसांना मिळाली. त्यामुळे पोलिसांनी तेथे छापा टाकला. बिअरचा मोठा साठा जप्त केला. याप्रकरणी मेडिकल स्टोअर्सचा संचालक निशांत ऊर्फ बंटी प्रमोद गुप्ता याला अटक केली. त्याच्याकडे चौकशीत मदिना बारचा मालक नीरज गुप्ता यानेच बिअरचा साठा मेडिकल दुकानात उपलब्ध करुन दिल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक रावसाहेब कोरे व त्यांच्या सहकारी मदिरा बार येथे पोहचले तर तेथे सरकारी सील तोडलेले आढळून आले. तेथील दारु व बियरची मोजणी करण्यात आली. तेव्हा मदिरा बार सील केला त्यापेक्षा वेगवेगळ्या प्रकारच्या मद्याच्या ६६५ बाटल्या तर बियरच्या ३३८ बाटल्या कमी आढळून आल्या़ याचा अर्थ बार मालकाने सरकारी सील तोडून १ हजार ३ बाटल्या चोरुन विक्री केल्याचे स्पष्ट झाले. याची जिल्हाधिकारी ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली. जिल्हाधिकार्‍यांनी बारचा परवाना कायमस्वरुपी रद्द करण्याचा व बारमालक नीरज गुप्ता याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार उत्पादन शुल्क विभागाने मदिरा बारचा परवाना कायमस्वरुपी रद्द करण्याचा गुप्ता याच्या हातावर ठेवला. शहरातील सील केलेले बार आणि वाइन शॉप यांच्याकडील स्टॉकची मोजणी केली तर ती अशीच कमी भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या धडक कारवाईने आता छुप्या मार्गाने मद्य आणि बीअरची विक्री केलेल्या बार मालकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.